पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२ । केसरीची त्रिमूर्ति

आहे ही जाणीव जशी केवळ बौद्धिक असून चालत नाही, ती अनुभूति असावी लागते त्याचप्रमाणे राष्ट्रीय अस्मितेची जाणीव केवळ बौद्धिक असून चालत नाही. ती रक्तांत भिनून मनुष्य जेव्हा अन्याय, जुलूम, पारतंत्र्य, गुलामगिरी यांच्या प्रतिकारासाठी, आणि त्याला अवश्य असणाऱ्या सर्वस्वत्यागासाठी सिद्ध होतो तेव्हाच त्याचें स्वत्व जागृत आहे, त्याला 'स्व'चा अभिमान आहे. असें म्हणतां येईल. हा अभिमान कोण निर्माण करूं शकेल ? सर्वस्वाचा होम करण्यास जो स्वतः सिद्ध झाला आहे त्यालाच हें सामर्थ्य आहे. हें सामर्थ्य विष्णुशास्त्र्यांच्या ठायीं होतें. म्हणून त्या परंपरेंतले लोकनेते जे लो. टिळक त्यांच्या वर्चस्वाखाली जेव्हा काँग्रेस आली तेव्हाच ती जिवंत झाली. तोंपर्यंत म्हणजे १८९० नंतरची दहा-पंधरा वर्षे तिला एखाद्या वार्षिक संमेलनाचें रूप आलें होतें. कारण तिच्या नेत्यांची संघर्षाची तयारी नव्हती. त्यांचें तत्त्वज्ञानच त्याच्या विरुद्ध होते. इंग्रजी राज्य ईश्वरी प्रसाद आहे, असें त्यांना वाटत होतें. म्हणून त्यांच्यालेखीं चळवळ याचा अर्थ येथली गाऱ्हाणी इंग्रजांच्या कानावर घालणें, त्यांना समजावून देणें, पटवून देणें एवढाच होता. यालाच टिळक अर्ज-विनंत्यांचे राजकारण असें म्हणत असत. त्या राजकारणांत अस्मितेचा प्रश्न येतच नाही. स्वत्व आणि अस्मिता यांचा लोपच तेथे अभिप्रेत असतो. अर्ज, विनंती यांत हा लोप गृहीतच धरलेला असतो. रानडे, दादाभाई, गोखले 'इंग्रजी राज्य म्हणजे ईश्वरी कृपा' मानीत होते; पण इंग्रज अधिकारी, ते व त्यांच्या मागची स्वत्वहीन जनता यांच्याबद्दल काय म्हणत असत ? मॅक्स ओरलचें वाक्य मागे दिलेच आहे. "तीस कोटि लोक इग्रजांचे जोडे पुसण्यांत धन्यता मानतात !" याला विष्णुशास्त्री यांनी उत्तर दिलें, "आम्ही जोडे पुशीत नाही. त्या पादत्राणांचा आम्ही निराळा उपयोग करतों !"