पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक पाय तुरुंगांत । २९

असें वारंवार म्हटलें आहे. वरील नेमस्त नेते आणि या नव्या पंथांचे नेते यांच्यांतील फरक ध्यानांत घेतल्यावर त्याचा अर्थ स्पष्ट होईल. 'जयासि जिवाचें वाटे भय त्याने क्षात्रधर्म करूं नये ।' असें समर्थांनी म्हटलें आहे. राष्ट्रसभेचें कार्य हा त्याहि काळांत क्षात्रधर्मच होता. विष्णुशास्त्री आपल्या निबंधमालेतून त्याचीच शिकवण देत होते. पहिल्या अंकापासून त्यांनी हिंदी जनतेचा तेजोभंग करणाऱ्या इंग्रजांवर हत्यार धरलें होते; आणि मालेच्या शेवटच्या प्रबंधांत इंग्रज या जगांतच नसते तरी कांही बिघडलें नसतें, असें बेधडक सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती ! त्यावांचून स्वत्व-जागृति झाली नसती.
 राष्ट्रसभेच्या स्थापनेपासून रानडे व तेलंग या दोघा थोर नेत्यांनी तिच्या संवर्धनासाठी अविरत कष्ट केले होते. १८९० च्या सुमारास या दोघांची सांपत्तिक - दृष्ट्या अगदी सुस्थिति होती. तरीहि सरकारी नोकरी की राष्ट्रसभेचें राजकारण, असा प्रश्न येतांच त्यांनी राष्ट्रसभा सोडून दिली, अनेक वर्षांचें अंगीकृत कार्यं सोडून दिलें; आणि सरकारी नाराजी ओढवून घेण्याची आपत्ति टाळली.
सर्वस्वाचा होम
 राष्ट्रीय अस्मितेचें पोषण अशाने कसें होणार ? मानवी चित्तांतील अहंचा पोष, त्यासाठी सर्वस्वाचा होम करण्यासाठी जेव्हा मनुष्य सिद्ध होतो, तेव्हाच होतो. विष्णुशास्त्री यांनी स्वत्वाची जागृति केली असें म्हटलें म्हणजे कोणी विचारतात की, त्या आधीच्या नेत्यांना स्वत्वाचा, या देशाचा, त्याच्या प्राचीन परंपरेचा अभिमान नव्हता काय ? निश्चित होता. त्याच अभिमानाने प्रेरित होऊन तेलंगांनी वेबर, लॉरिन्सर यांना उत्तर देणारे प्रबंध लिहिले. रानडे यांचा अभिमानहि जागजागीं प्रगट झालेला आहे; पण तो अभिमान दुबळा आहे. सरकारी वक्रदृष्टि होताच तो निस्तेज होतो. सर्वस्व अर्पणास तो सिद्ध होत नाही. त्यासाठी सिद्ध होणारे आगरकर टिळकांसारखे पुरुष शास्त्रीबुवांच्या परंपरेंत निर्माण झाले. विष्णुशास्त्री यांनी या भूमींत तेज निर्माण केलें, तिला चित्कळेचा स्पर्श घडविला, याचा अर्थ असा आहे.
काँग्रेस इंग्लंडमध्ये !
 राष्ट्रसभेचे संस्थापक ॲलन ह्यूम निवृत्त होण्याची वेळ आली तेव्हाहि हेंच दिसून आलें. १८९१-९२ च्या सुमारास ह्यूमसाहेबांची प्रकृति नीट राहीना. त्यामुळे त्यांनी इंग्लंडला कायम जावयाचें ठरविलें; पण त्यांना एक चिंता होती. राष्ट्रसभेचें- काँग्रेसचें- काय करावयाचें ? पांच-सहा वर्षे त्या तिघा इंग्लिश अधिकाऱ्यांनी गाडीचा मार्ग आखून तो नीट चालवून दाखविल्यानंतरहि येथले नेमस्त प्रागतिक नेते हा भार पेलण्यास समर्थ आहेत, असें त्यांना वाटेना. त्यामुळे काँग्रेस यापुढे इंग्लंडमध्ये भरवावी असा विचार त्यांनी मांडला. आणि अत्यंत लज्जेची गोष्ट अशी की, १८९२ सालच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनांत नेमस्त नेत्यांनी तसा ठरावहि