पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-२-

आत्मप्रत्यय


 इंग्रज सत्ताधाऱ्यांना तर काय, हिंदी लोक जितके भग्नतेज, हतप्रभ, स्वत्वहीन होतील तितके हवेच होते. त्यामुळे त्यांचा मिशनऱ्यांना सर्वस्वीं पाठिंबा होता. प्रारंभी त्यांनी मिशनऱ्यांवर कांही बंधने घातली होतीं, पण तीं केवळ भीतीमुळे होतीं हे वर सांगितलेंच आहे. मिशनऱ्यांच्या हिंदुधर्मनिदेमुळे कदाचित् दंगली माजतील या भीतीनेच ते विरोध करीत, पण मनांतून हिंदुस्थान सर्व ख्रिस्ती झाला तर तें त्यांना हवेंच होतें. कारण त्यामुळे आपले साम्राज्य निर्वेध चालेल असे त्यांना वाटत असे.
 ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख डायरेक्टर मँगल्स हा १८५७ साली हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हणाला की, "हिंदुस्थानच्या या टोकांपासून त्या टोकापर्यंत ख्रिस्ताचा ध्वज डौलाने फडकविण्याकरिताच हें हिंदुस्थानचें अफाट साम्राज्य ईश्वराने आपल्या हातीं सोपविलें आहे. म्हणून सबंध हिंदुस्थान ख्रिस्तमय करण्याच्या या महत्कार्यात कोणत्याहि प्रकारची ढिलाई न करतां प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न करणें अवश्य आहे." हिंदुस्थानांतलें धर्म, आणि विशेषतः हिंदु धर्म नष्ट झाला की येथील राष्ट्रीय भावनाहि मरून जाईल, आणि मग अशा स्वत्व मेलेल्या राष्ट्रावर राज्य करणें सोपें होईल, अशी इंग्रजांची कल्पना असल्यामुळे, ईस्ट इंडिया कंपनीचा हा अट्टाहास चालला होता.
 रेव्हरंड केनेडी हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सारखे बजावीत होता की, "हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारतवर्ष ख्रिस्ती धर्माला कवटाळीपर्यंत, आणि तो हिंदूंच्या व मुसलमानांच्या धर्माची निर्भर्त्सना करूं लागेपर्यंत, आपलें