पान:कबुतरखाना.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मरणपालखी

मेलेल्या गावातून
मीच घेऊन चाललोय
माझ्या मृत्यूची पालखी

माझ्या मरणपालखीला खांदा देणारा
प्रत्येक खांदेकरी मीच,
एखाद्या षड्यंत्राचा भाग असावा तसा

पालखीच्या पडद्याआडून निरखतंय
या मेलेल्या गावानं उभारलेल्या यंत्रकमानी
माझं टक्क थिजल्या निस्तेज डोळ्यांचं प्रेत
...या कमानी केवळ माझ्यासाठी नव्हत्या
अशा किती तरी पालख्या माझ्या मागे पुढे असणार.

एक छोटासा धक्का लागून
पालखी गचकून थांबते
पडद्यातून एक अनाहूत हात आत येतो
आणि माझ्या सताड डोळ्यांवरच्या
अंधारपापण्या मिटवून टाकतो.

अंधाराच्या खोल गर्तेत गुदमरत जाता जाता
समाधान एवढंच
मेलेल्यांच्या डोळ्यांवर
अंधाराचं कातडं ओढणारे जिवंत हात
या गावात अजूनही शाबूत आहेत.

८० / कबुतरखाना