पान:कबुतरखाना.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषा २

भाषा घडवते प्रवास व्यवहारांचे
पण कधी मुक्कामाचे स्टेशन भेटतच नाही
नुसतीच भेटतात खडखडत स्टेशन्सवर स्टेशन्स
प्रत्येकवेळी आपण खिडकी उघडायची 'अर्थाची'
तर दुसरंच स्टेशन असतं अनोळखी,
धुक्यात गुरफटलेलं
आणि खिडकीबाहेर उभा असतो एखादा लालचावलेला
प्रशिक्षित ओशाळ अनाहूत दान मागणारा काळ होऊन
...संधी मिळाली तर, त्याचा नाटकी दुबळेपणा
क्षणार्धात पडणार असतो गळून
आणि त्यानं ओरबाडायचं असतं तुमचं नशीब सटदिशी
म्हणून घाईघाईनंच बंद करायची असते अर्थाची खिडकी

भाषा तुम्ही संपेपर्यंत सोबत राहते सदोदित
स्टेशनामागून स्टेशन
मुक्कामाचं स्टेशन कुणीच बघितलेलं नाही आजवर
'प्रवास संपण्याआधीच टप्प्याटप्प्यावर प्रवासीच संपले आहेत!'
असाच भाषेचा आजवरचा इतिहास आहे.

कबुतरखाना / ४१