पान:इहवादी शासन.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४० । इहवादी शासन
 

मार्क्स·धर्मानेच सांगितले होते. त्यामुळे ती त्यांनी प्रारंभापासूनच आरंभिली होती. शाळा-महाशाळांतून विज्ञानाच्या अध्यापनावर सर्व शक्ति केंद्रित करून त्यांनी नव्या पिढीत आमूलाग्र मानसिक परिवर्तन घडवून आणलें होतें; आणि या नव्या शक्तीनेच त्यांच्या अंधसैद्धान्तिक धर्मावर आघात केल्यामुळे, प्रथम एका क्षेत्रांत, नंतर दुसऱ्या, नंतर तिसऱ्या क्षेत्रांत अशी क्रमाक्रमाने त्यांना माघार घ्यावी लागली. बुद्धिप्रामाण्य, वस्तुनिष्ठ सत्य संशोधन व्यक्तिवाद या तत्त्वांपुढे त्यांना शरणागति पत्करावी लागली. आणि सहजगत्या इहवादी व्हावे लागले. त्यांनी आपली मार्क्सवादी भूमिका अजूनहि सोडलेली नाही. पण आता शास्त्रज्ञ मार्क्सवादांतील विरोध-विकासवाद व ऐतिहासिक जडवाद हीं तत्त्वें अशास्त्रीय व निराधार आहेत असे प्रतिपादून मूळ मार्क्स-धर्माला तात्त्विक भूमिकेवरूनच शह देत आहेत आणि सोव्हिएट नेत्यांना औद्योगीकरण, लष्करी सामर्थ्याचा विकास यांकडे लक्ष ठेवून ही बंडखोरी सहन करावी लागत आहे. हा क्रम असाच चालला- तसा तो चालेल असे आज वाटत आहे- तर लवकरच सोव्हिएट शासन मार्क्सवादाच्या शृंखलांतून मुक्त होईल आणि मग ते पूर्णपणें इहवादी होईल अशी आशा करण्यास जागा आहे.