पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

८७



गुलामगिरी


 धर्म, जात, रंग, कुलशील किंवा देश याचा विचार न करतां सर्वांना समतेच्या पातळीवर आणण्याचे महान कार्य इस्लामनें कसें केलें आहे याची सर्वसाधारण कल्पना वाचकांस आली असेल, त्याचप्रमाणे समतेस पोषक होणारे आणखी एक महान कार्य इस्लामने केले आहे आणि ते म्हणजे मानवतेस काळीमा आणणाऱ्या गुलामगिरीचे उच्चाटण होय. ज्या वेळी इस्लामची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या वेळी सर्वत्र गुलामगिरीचे थैमान चालू होते. त्या काळी नाणावलेल्या राष्ट्रांत तर गुलामगिरी म्हणजे त्या राष्ट्राचे वैभव असें समजण्यांत येई. त्या काळचे किंवा त्या पूर्वीचे लोकधुरीण, राज्यकर्ते यांनी गुलामगिरीचा पुरस्कार केला आहे. एपिक्युरीयन, स्टूईक्स इत्यादि तत्त्वज्ञानांतून तोच सर निघाला आहे. कोणत्याही शासन किंवा धर्म संस्थेनें गुलामगिरीस पायबंद घालण्याचा प्रयत्न केला नाही. त्या काळच्या गुलामगिरीची वर्णने वाचली म्हणजे अद्याप आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. एक प्रथितयश विद्वान, गुलामगिरीचे विदारक वर्णन करीत असतां लिहितो, ." मानेभोंवतीं लोखंडी पट्टी ही गुलामांची खूण होती. गुलामांना गटांगटांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणास जनावरांसारखे हांकून नेत असत. जनावर देखील खाणार नाही असें अन्न त्यांना देण्यांत येई. हातापायांत बेड्या घालून व गळ्यांतील लोखंडी पट्ट्यांमधून सांखळी अडकवून सर्वांना एकत्र बांधीत व अत्यंत घाणेरड्या आणि बंदिस्त जागेत त्यांना कोंडून ठेवीत. त्यांना विकण्याकरितां हांकून नेत असतां गुलामांचा व्यापार करणारा त्यांचा मालक घोड्यावर बसून हातांत जाड चाबूक घेई आणि