Jump to content

पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१९१


Averroes या नांवाने सर्वत्र ओळखले जातात. 'अल-कुल्लीयात' (Colliget) या नावाने प्रसिद्ध पावलेल्या महान ग्रंथाचे जनकत्व इब्न रुश्दकडे आहे. या शास्त्रज्ञांनी वैद्यक शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले असून त्यांची योग्यता अबू सीना यांच्या बरोबरीची समजली जाते. त्या दोघांबद्दल एक ग्रंथकार म्हणतो, " अबू सीना व इब्न रुश्द या दोघांनी सोळाव्या शतकापर्यंत वैद्यकशास्त्रावर प्रभुत्व गाजविलें."*

 बाराव्या शतकाच्या सुरुवातीस अबू मेरवान अबदुल मलिक इब्न जहूर नांवाचे शास्त्रज्ञ उदयास आले. सबंध युरोप त्यांना Avenzoar या नांवाने ओळखं लागला. त्यांनी लिहिलेला 'अत तयसीर' नांवाचा ग्रंथ अत्यंत उपयुक्त समजला जातो. त्यांनी लावलेले अनेक वैद्यक शोध त्यामध्ये संग्रहित करण्यांत आले आहेत. या ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली आहेत. इब्न जहूर यांचा शारीरशास्त्र (Anotomy) हा आवडता विषय असल्यामुळे त्यावर त्यांनी केलेले संशोधन प्रशंसनीय मानले जाते.

 यांखेरीज अनेक मुस्लिम शास्त्रज्ञांनी वैद्यकशास्त्रांत आपल्या अनुभवाची व विद्वत्तेची भर घातली आहे. अबु बक्र मोहम्मद इब्न बाजा ( Avempace.) यांनी वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहून ठावले आहेत. अली इब्न ईसा, अबू याकूब इसहाक, उमर इब्न अली हे तर विख्यात नेत्रशास्त्रज्ञ होते. त्यांनी नेत्ररोगावरील वाङ्मयांत मोलाची भर घातली आहे. त्यांच्या ग्रंथांची भाषांतरें लाटनमध्ये झाली असून युरोपमध्ये इ. स. १७५० पर्यंत ही पुस्तकें अभ्यासक्रमांत दाखल करण्यांत आली होती. मूसा इब्न मयमून


* Historian's History of the World, Vol. 8, P. 270.