पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१३७.



धर्ममंदिरांचेही संरक्षण करण्यांत येई, मुस्लिमेतरांचे कज्जे त्यांच्या न्यायाधिशांकडून त्यांच्या कायद्यांप्रमाणे चालविले जात. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे हजरत पैगंबरांनी प्रस्थापित केलेले राज्य हे न्याय, समता आणि बंधुता यांवर आधारलेलें 'अल्लाचे राज्य' होते असे म्हणावयास हरकत नाही."

 त्या राज्यशास्त्रांत प्रत्येक व्यक्तीला धर्म, आचार व विचारस्वातंत्र्य आहे. मुस्लिम राजवट म्हणून परधर्मीयांच्या धर्मावर गदा आणावयाची, त्यांचे आचारविचारस्वातंत्र्य काढून घ्यावयाचे किंवा त्यांना निरनिराळ्या मार्गांनी छळावयाचे हे आततायी ब लोकशाहीला काळीमा लावणारे प्रकार निषेधार्ह समजण्यांत आले आहेत. त्या काळीं जेत्यांनी पराभूत केलेल्या परधर्मियांचे शिरकाण करण्याची प्रथा होती. राज्य मिळविण्यापेक्षां परधर्मीय नागरिकांची कत्तल करणे हे अधिक महत्त्वाचे समजले जात होते. मध्ययुगीन काळांत, अशा अत्याचारांनी सबंध इतिहास रक्ताळलेला आहे. कित्येक वेळां प्रतिक्रिया म्हणून एकाद्या मुस्लिम राज्यकर्त्यांस असे अत्याचार करण्याचा मोह उत्पन्न झाल्यानंतर त्याला कसें परावृत्त करण्यांत येई याचे वर्णन प्रसिद्ध इतिहासकार एडमंड ऑलिव्हर याने केले आहे. तो म्हणतो, " कित्येक वेळां सुलतानास रक्ताचा सूड घेण्याची बुद्धि होत असे पण तशा प्रत्येक वेळी मुफ्ती परधर्मियांची कत्तल करणे किंवा त्यांच्या धार्मिक आचारविचारांवर बंधन घालणे हे पवित्र कुराणच्या आज्ञेविरुद्ध आहे' असे स्पष्टपणे सांगत व सुलतानही त्याप्रमाणे वागे."*


* Cessel's History of Russo-Turkish War, Vol. I. Page 269.