Jump to content

पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "शहरात बाया एक होतात. रिकामे हंडे घेऊन सरकारी साहेबाकडं जातात. जोराजोरात मागणी करतात. मग सायबाला ऐकावंच लागतं. गावचा पुढारी. तोही मदत करतो. आपणही तसेच करू. पंचायत समितीत जाऊ. सभापतीला आपली अडचण सांगू. पलडागावची केशर देशमुखीण. तिला निवडून दिलंय आपण. तिला बरोबर नेऊ. किती दिवस हाल सोसायचे? लेकरू रडलं नाही तर माय दूध पाजत नाही. हे तर सरकार आहे!!" सविताचे बोलणे बायांना कळत होते. पटत होते.
 मग ठरले. सोमवारी तालुका गाठायचा. अहमदपूर गाठायचे. प्रत्येक बाईन यायलाच हवे असे ठरले.
 गावातली पुरुष माणसं.. तीही बुढी. बायांचा बेत ऐकून मनात हसली. बायांचं काय चालणार सरकारी सायबापुढे? बायांचं डोकं चुलीसमोर चालायचं. सरकारी ऑफिसात यांची डाळ कशी शिजणार?
 पण बायांनी मनावर घेतलं: बुधवारी तालुक्याचं गाव गाठलं. हिरा, सखुमाय, सविता अशा पाच-सातजणी केशर देशमुखिणीकडे गेल्या. तिची भेट घेतली. कुरणवाडीची जंजाळ कथा तिच्या कानावर घातली. हिरा बोलू लागली, "पुढारीण सासूबाई, तुमची हिरा वाचली. तिचं नशीब मोठं. सविता गावात होती. पण दरसाली गावातली नवी