पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपणच स्त्री म्हणून कमी पडलो असं वाटून अपराधी वाटत राहतं. पण कुणाला बोलून दाखवायचं? कुणाजवळही बोललं तरी गावभर चर्चा होणार. काहीजणी नवऱ्याला आग्रह धरतात की, 'तू मला फक्त एक मूल दे, नंतर मी काहीही मागणार नाही.' ज्यांना हे शक्य असतं त्यातले अनेक जण तेच करतात. एक मूल झाल्यावर परत बायकोला हात लावत नाहीत. काहींना ते शक्य नसतं. डॉक्टरकडे जा, औषधं घ्या या गोष्टी चालू असतात. पण आपल्या लैंगिकतेबद्दल बायकोपाशी बोलू शकत नाहीत. नवऱ्याला शरम वाटायला लागते. आपण पुरुष म्हणून कमी पडलो म्हणून तो बांयकोला टाळायला लागतो. स्वतःला कामात गुंतवून घेणं, जास्त वेळ घराबाहेर राहणं, दारू पिणं इ. गोष्टी वाढतात. घरच्यांबद्दल, मित्रमंडळींबद्दल तिरस्कार वाढत असतो. “लग्न होऊन सहा महिने झालेत. मी अजून तिच्याबरोबर संबंध केलेला नाही. तिला मिठी मारतो, किस करतो पण त्याची सुद्धा किळस येते. मी उत्तेजित होत नाही. त्यासाठी मी बाहेरगावची नोकरी घेतली. घरात राहणं नको.... मी पुरुषांना मनात आणून उत्तेजित होऊन तिच्याबरोबर सेक्स करायला बघतो. पण तिचा स्पर्श जरी झाला तरी नको वाटतं. सुरुवातीला ती समजून घ्यायची. आता तिची चिडचिड वाढते आहे. तिचा दोष नाही. मी स्वत:ला दोषी धरतो पण मग मनात विचार येतो की समाजानी मला स्वीकारलं असतं तर मला आणि तिला हा त्रास सोसावा लागला नसता. मग मी फक्त स्वतःला का दोष लावून घेऊ?” नवरा भिन्नलिंगी लैंगिक कलाचा असला आणि बायको लेस्बियन असली तर नवरा कितीही चांगला असला तरी संसार करणं अवघड होतं. आपल्या जोडीदाराची लैंगिकता कोणती आहे हे अनेक पुरुषांना आयुष्यभर माहीत नसतं. अशा वेळेस स्त्री फक्त कर्तव्यापुरता संबंध ठेवते. ते करतानासुद्धा तिला किळस वाटते. त्यातून तिची भावनिक, लैंगिक गरज पुरी होत नाही. आपली बायको समलिंगी आहे हे जर नव-याला कळलं तर पुरुषाला आपण कुठं तरी कमी पडलो हा न्यूनगंड येतो. आपण स्त्रीला मानसिक, शारीरिक सुख देऊ शकत नाही हे मनात सलत राहतं. काही वेळा बायकोला तिच्या नवऱ्याच्या लैंगिकतेबद्दल कळतं. घरात भांडणं होतात. बायको म्हणते ‘एक वेळ एखादी बाई मी खपवून घेतली असती पण एक पुरुष ?' बायको घटस्फोट घेते किंवा घरातल्या घरात वेगळं रहायला लागते. सगळ्यांवर प्रचंड ताण येतो, नैराश्य येतं. जोडीदाराची लैंगिकता कळली तरी काही कुटुंबात दोघांचीही घटस्फोटाची तयारी नसते. घटस्फोट घेतला तर समाज नावं ठेवेल ही भीती मनात असते. मग दोघंजण नावापुरतं एकत्र राहतात व संसार करायचं नाटक करतात. इंद्रधनु... ८३