पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकविसावे शतक विसाव्या शतकाच्या शेवटी जागतिकीकरण, तंत्रज्ञान, माध्यमांचा (टीव्ही, इन्टरनेट इ.) वाढता प्रभाव यामुळे समाजात झपाट्याने बदल होऊ लागले. जागतिक घडामोडी सहजपणे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचू लागल्या. कुठलाही विषय समाजापासून लपवून ठेवण्याच्या शक्यता कमी झाल्या. सरकारी माध्यमांवर जरी निबंधनं असली तरी खासगी माध्यमांतून लैंगिक विषय समोर येऊ लागले. हा बदल समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. कोणताही विषय समाजासमोर येणं, त्याच्या विविध पैलूंवर चर्चा होणं, त्यावर विचार होणं, अंतर्मुख होऊन त्याच्यावर चिंतन करणं हे समाजाच्या दृष्टीने हिताचंच असतं. अर्थात हे मंथन होत असताना असुरक्षितताही निर्माण होते. समलैंगिकतेबद्दल हेच दिसतं. पूर्वी या विषयावर बोललं जात नव्हतं. विषय निघाला तरी थट्टा किंवा अशा व्यक्तींबद्दलचा द्वेष याच मार्गाने तो व्यक्त व्हायचा. आज विविध माध्यमांमधून हा विषय समोर येतो आहे. काही समलिंगी व्यक्ती उघडपणे त्यांची जीवनशैली जगताना दिसत आहेत. काही जण त्यांचे अधिकार मागू लागले आहेत. यामुळे लोकांची असुरक्षितता वाढायला लागली आहे. (पूर्वी समलैंगिकतेबद्दल न बोलणं हाही एक असुरक्षिततेचाच भाग होता.) ही असुरक्षितता वेगवेगळ्या मार्गातून दिसू लागली आहे. उदा. दोन मुलांनी, पुरुषांनी एकमेकांच्या हातात हात धरून चालणं, खांद्यावर हात ठेवणं, कमरेभोवती हात टाकणं आपल्याकडे उघडपणे केलं तरी चालत होतं. मला काही अमेरिकन विचारतात की, 'हे सगळे गे आहेत का?' मी म्हणतो 'नाही. तुम्हाला असं का वाटतं?' ते म्हणतात 'आमच्या संस्कृतीत समान लिंगाच्या व्यक्तींनी कोणतीही शारीरिक जवळीक करणं हे समलिंगी कल असल्याचं लक्षण मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या समान लिंगाच्या व्यक्तीपासून काही अंतर ठेवणं अपेक्षित असतं.' अशी वागणूक त्यांच्या समाजरचनेचा एक भाग आहे. (ही रचना मोडण्याची परवानगी फक्त खेळात मिळते. खेळाडूंनी एकमेकांच्या अंगावर उड्या मारणं इ. गोष्टी चालतात. हीच एक शारीरिकदृष्ट्या 'मेल बाँडिंग' व्यक्त करायची पळवाट त्यांच्या इथे उपलब्ध आहे.) समलैंगिकता हा विषय जसा-जसा चर्चेत यायला लागला तसतसे कॉलेजचे विद्यार्थी दोन समान लिंगाच्या मित्रांना समलिंगी जोडपं म्हणून चिडवायला लागली आहेत. कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विरुध्द लिंगाचा जोडीदार असला पाहिजे हा दबाव वाढायला लागला आहे. एखाद्या मुलाला किंवा मुलीला जोडीदार नाही हा नावं ठेवण्याचा विषय बनला आहे. इंद्रधनु ... २५