पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिरोधार्य आहे. आजच्या भोगवादाच्या युगात तर तिची खरी जरुरी आहे. गीतेवरती इतके अफाट वाङ्मय प्रसिद्ध झालेले आहे की गीतेला वैश्विक स्तरावर उच्च स्थान प्राप्त झालेले आहे. गीतेचे तत्त्वज्ञान काही प्रमाणात जरी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग होईल तर समाज सुखी होईल. उपनिषदांतील मानसशास्त्र :  उपनिषदांचा काळ तसा अतिशय प्राचीन कालखंड म्हणावा लागतो. त्या कालखंडात मानसशास्त्र अस्तित्वात होते यावरच आधुनिक विचारसरणीच्या लोकांचा विश्वास बसणार नाही. पण ते सत्य आहे. त्यांच्या मानसशास्त्राचे तीन भाग पाडले गेले आहेत.

(१) आधिभौतिक
(२) विकृत (विश्लेषणात्मक)
(३) आध्यात्मिक
 या तिन्ही भागांचे केले गेलेले स्वतंत्र विवरण त्याची कल्पना देत असले तरी,यातील तज्ज्ञ असे म्हणतात की, आध्यात्मिक भागाचा जेवढा सखोल अभ्यास झाला होता, त्यामानाने विकृत भागाचा कमी व त्याहूनही आधिभौतिक भागाचा कमी विचार त्या ऋषि-मुनींनी केला होता. त्याचा आढावा हा विचारप्रवर्तक आहे.
१) आधिभौतिक मानसशास्त्र : मन आणि पचनक्रिया :

 मन आणि पचनक्रियेविषयी मुख्यतः छांदोग्य उपनिषदात खूपच चर्चा आढळते.सर्वच मूळ श्लोक द्यावयाचे म्हणजे अति विस्तार होईल म्हणून श्लोकांचा अर्थ व मूळ श्लोकांचा कंसात संदर्भ दिला आहे. माझ्या 'आहार-एक यज्ञकर्म' या पुस्तकात यावर चर्चा केली आहे. जिज्ञासूंनी ती चर्चा व मूळ उपनिषदातील श्लोक पाहावेत.त्यातील आरुणी ऋषींनी आपला पुत्र व शिष्य श्वेतकेतू याबरोबर प्रदीर्घ चर्चाकेलेली आहे.

६६