पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते असे की "आत्मा हेच परमप्राप्तव्य". याचा अर्थ मात्र स्वतःच्या एकटेपणात, केवळ ज्ञानस्वरूपात रमून जाणे असा नव्हे. आत्मा कसा प्राप्त करून घ्यावयाचा? आत्मा ही काय एखादी वस्तू थोडीच आहे? आत्मा प्राप्त करून घ्यावयाचा, तो म्हणजे विश्वात्मैक्याचा अनुभव घ्यावयाचा. सर्व काही भरून उरलो आहे तो मी. “ इदं सर्वं यद् अयम् आत्मा ।" असा अनुभव घ्यावयाचा. “हे विश्वचि माझे घर" हे त्याचे आधुनिक स्वरूप. येथे सर्व अहंकार गळून पडतो असे म्हटले तर तो 'वदतोव्याघात' असेल कारण जेथे तेथे मी म्हणजेच अहंकार. पण याचा खरा अर्थ असा की मी स्वतंत्र कोठे उरलो आहे? मी तर विश्वाशी एकरूप झालो आहे, हाचसाक्षात्कार मला झाला आहे. आणि तो म्हणजे परमोच्च आनंद. “यो वै भूमा तत्सुखम्।” जी भूमाची स्थिती ती म्हणजे अमृतत्व, ते अमर आहे. जो अल्प आहे जो संकुचित आहे तो मर्त्य आहे (छां. ७.२३-२४). याज्ञवल्क्य आपली पत्नी मैत्रेयी हिला सांगतो की आत्माच प्रियतम असावा. गाई, घोडे, सोने, नोकर चाकर,शेती या सर्व गोष्टींना महत्त्व जरूर आहे, ते इतर कशासाठी तरी. पण आत्मा हाइतर कशासाठी नव्हे तर तो स्वत:साठी, केवळ आपल्यासाठी व स्वतःमुळे प्रियअसतो. तो "स्वे महिम्नि" प्रतिष्ठित आहे. बृहदारण्यकोपनिषदात म्हटले आहे"सहोवाच, न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति - आत्मनस्तु कामाय पतिःप्रियो भवति ।” पत्नीला पती काय किंवा पतीला पत्नी काय स्वतःसाठीच प्रियअसते. यापुढे जाऊन - "न वा अरे सर्वस्वं कामाय सर्वं प्रियं भवत्यात्मनस्तु कामायसर्वं प्रियं भवति । आत्मा वा अरे द्रष्टव्यः, श्रोतव्यो, मन्तव्यो, निजिध्यासितव्यः ।”आत्म्याचा निदिध्यास लागो.
 प्रत्येक मानवाला आयुष्यात काही कर्तव्ये असतात. ती पार पाडावीच लागतात.पण ही 'कर्तव्य कल्पना' आप्तव्य कल्पनेला सोडून नाही. कृतकृत्य माणूस आप्तकामहोतो व आप्तकाम झाल्याने अमृत होतो. (ऐतरेय ४.४-६) हा आप्तकाम मनुष्यमोहरहित, शोकरहित, अभय व शांत होतो. तो परमसाम्याला पोचतो. (मुं. ३.१- ३) मानव्याचा आदर्श काय? तो म्हणजे शुभजीवन: असे आदर्श निर्माण करणे हे नीतिशास्त्राचे काम आहे. आणि ते उपनिषदांनी निर्माण केले आहेत.

 निसर्गाचे स्वतःचे काही नियम आहेत, काही शिस्त आहे जी सर्व प्राणीमात्रांसलागू असते. दैनंदिन जीवना नीट होण्यासाठी उपनिषदांनी काही रेषा आखून देण्याचे

६२