पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१) ऋग्वेद : आयुर्वेद, काही तज्ज्ञ याला अथर्ववेदाचा उपवेद मानतात.
(२) अथर्ववेद : स्थापत्यवेद
(३) सामवेद : गांधर्ववेद
(४) यजुर्वेद : धनुर्वेद
 काही विद्वान फक्त ऋग्वेद व अथर्ववेद यांनाच केवळ मूल वेद म्हणतात. यजुर्वेदातील बराचसा भाग ऋग्वेदातीलच आहे. फक्त त्याची मांडणी यज्ञाच्या सोयीनुसार केलेली आहे. ऋग्वेदातील मंत्र छंदोबद्ध आहेत. पण यजुर्वेदात मधून मधून गद्यभागी येतो. यजुर्वेदाच्या 'कृष्ण यजुर्वेद' व 'शुक्ल यजुर्वेद' अशा दोन संहिता आहेत. सामवेदातील एकूण १५४९ सूक्तांपैकी जर ७५ सूक्ते वजा केली तर बाकी सर्व सूक्ते ऋग्वेदातीलच आहेत. यामुळेच मूलवेद दोनच उरतात असे म्हटले जाते.
 प्रत्येक वेदाचे (१) संहिता (२) ब्राह्मणे व (३) अरण्यके व उपनिषदे असे तीन भाग पाडले गेले आहेत. संहितेत मुख्यतः देवांच्या स्तुतिपर मंत्र असतात. ब्राह्मण ग्रंथात प्रामुख्याने यज्ञक्रियेचे वर्णन, यज्ञ का व कसे करावेत याची चिकित्सा आहे. अरण्यके व उपनिषदे यांत प्रमुख विषय तत्त्वविचार हा आहे. ब्राह्मणे एकाअर्थी पूर्णपणे कर्मकांड आहे. नंतरच्या काळातील ऋषि-मुनींनी कर्मकांडातून विशुद्ध ज्ञानकांडाकडे जाणे श्रेष्ठ मानले. अरण्यके म्हणजे कर्मकांड व उपनिषदांतील विशुद्ध ज्ञानाकडे जाण्याच्या मार्गातील सेतू आहे. अरण्यातील शांत वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात एकाग्र चित्ताने केलेले चिंतन व त्यातून समजलेले सत्य हे उपनिषदांमध्ये आलेले आहे. या विश्वाचे हार्द समजावून घेण्यासाठी केलेले अरण्यातील वास्तव्य म्हणजे वानप्रस्थाश्रमच समजण्यास हरकत नाही. या विचारवंतांच्या चिंतनातून निर्माण झालेले गूढ ज्ञान म्हणजेच तत्त्वज्ञान. याला धर्माच्या परीघ रेषा नाहीत. ते जैन असो वा बौद्ध, ते वैदिक तत्त्वज्ञानाइतकेच श्रेष्ठ आहे. आणि हे सत्य शोधणारे सगळेच ऋषि-मुनी. ही सर्व भारतीय इतिहासाची - भारतीयत्वाची पाळेमुळे आहेत.

 अरण्यवासातून ज्ञानप्राप्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे सत्यकाम जाबालीची कथा. देहविक्रय करणाऱ्या एका स्त्रीचा हा मुलगा. अतिशय बुद्धिमान व ज्ञानपिपासू. हा ऋषींकडे जाऊन त्यांना म्हणाला, "गुरुदेव, माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, मला

५३