पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय तत्त्वज्ञानाचे थोडक्यात अवलोकन :
 अध्यात्म म्हणजे 'नेत्र लागले पैलतीरी' अशी स्थिती प्राप्त झाल्यावर अमलात आणावयाची गोष्ट अशी तारुण्यात कल्पना असते. आजची भौतिक प्रगती अफाट झाली आहे यात संशय नाही. जगही लहान झाले आहे. पण याचा उपयोग आत्यंतिक भोगवादातच होत आहे. मग प्रगती व विकास या किंवा या अर्थी तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ काय? या भोगवादातून मानवी जीवनाचा अर्थच नष्ट होणार असेल, शारीरिक व मानसिकही ऱ्हास होणार असेल व त्याचबरोबर निसर्गाचा आपण विनाश घडवत असू तर असा तथाकथित विकास भकास विश्वात लोटत आहे असेच म्हणावे लागेल. अनेक विचारवंत हे पोटतिडिकेने सांगत आहेत, अनेक त्यागी समाजकार्यकर्ते हा विनाश थांबविण्यासाठी रचनात्मक कार्यही करत आहेत, परंतु विनाशाचा वेग पुनर्निर्मितीपेक्षा जास्त आहे. असे कार्यकर्तेही दुर्मिळ होत चालले आहेत. निसर्ग हा अनंत गोष्टी देत आहे, त्याचे फक्त निरीक्षण, चिंतन व अनुभूती हेसुद्धा एक विश्वविद्यालय असते. अनेक कथांद्वारे हे उपनिषदांमध्ये आलेले आहे.

 या विश्वामध्ये अंतिम सत्य या नावाची काही चीज आहे का ? या प्रश्नाचे उत्तर भौतिक शास्त्रांद्वारे मिळत नाही. भौतिक शास्त्रांचा विकास हा जरूर व अटळ असला तरी तो अंती मानवाच्या हिताचा असला पाहिजे. त्यातून गंभीर समस्या निर्माण होता कामा नये आणि नेमका हाच अनुभव आपण घेत असतो व आपला हातभारही त्याला लागत असतो. ज्याला आपण विकास म्हणतो तो मुख्यतः पदार्थ- विज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र अशा अचल गोष्टींच्या संशोधनामधून झालेला आहे. माणूस हा आजही आपल्याला समजलेला नाही. नवीन संशोधन व प्रगती ही मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी वापरली गेली पाहिजे, त्याचा मूलाधार मानवी अंतिम हिताचा असला पाहिजे. पण होत आहे उलटेच. हा भौतिक विकास मानव व निसर्ग यांच्या मुळावरच घाव घालत आहे. हे होत आहे अत्यंत भोगवादातून. मानवाची खरी उन्नती त्याच्या उन्नत मनामधून होत असते. पण आजचे चित्र बरोबर याच्या उलट दिसते आहे. हा ऱ्हास थांबवता आला पाहिजे. याद्वारेच सामाजिक नाहीशी होईल. याला उपाय म्हणजे अध्यात्माची कास धरणे, अध्यात्म निश्चितच मनाचे उन्नयन करू शकते.

४७