पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकारी' (Wolf Hunters) असे नाव दिले होते. त्यामुळे लांडगा हा प्राणी नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला. लांडग्यांचे जीवन, त्यांच्या सवयी यांचा अभ्यास करणारी मंडळी निर्माण झाली. लांडगा हा कळपाने राहणारा प्राणी. त्यांचा जो प्रमुख असतो. त्याला अल्फा लांडगा असे म्हटले जाते. कै. जगदीश गोडबोले यांनी ' 'लांडगा आला रे' हा अनुवाद प्रसिद्ध केला होता. त्यात त्या संशोधकाने अनेक वर्षे घालवून लांडग्यांची माहीती गोळा केली होती, त्याचे अनुभव कथन केलेले होते. या लांडग्यांपैकी एकानेही त्याच्यावर हल्ला केलेला नव्हता. यापुढची पायरी म्हणजे अस्तित्वच धोक्यात आलेल्या लांडग्यांचे बंदिस्त जागेत प्रजनन, पिल्लांची जोपासना व शेवटी त्यांना त्यांच्या मूळ जंगलात प्रस्थापित करणे. ह्या विषयावर 'नॅशनल जिओग्राफिक' मध्ये जी सीरिअल आली होती त्यातील अभ्यासकाने वीस वर्षे त्यांच्या सहवासात घालवली. नष्ट होणाऱ्या जातीच्या पुनर्प्रस्थापनेचा हा एक भाग. लांडग्याच्या अनाथ बच्चांची आई होऊन त्यांना दूध पाजणे, त्यांच्याशी खेळणे, हळूहळू त्यांना नैसर्गिक जीवनात पुनर्प्रस्थापित करणे हा तो कार्यक्रम. असा एक कळपच तयार झाला. लांडग्याच्या जातीचे सामाजिक जीवन, त्यांची भाषा यावर त्याने प्रभुत्व मिळविले आणि तो त्या कळपाचा एक घटकच झाला. त्यातील अल्फा लांडग्याला संभाळावे लागते, त्याचा योग्य मान ठेवावा लागतो, नाहीतर आपल्या वर्चस्वाला दुसरा कोणी आव्हान देऊ लागला तर सर्वस्व पणाला लावून त्या शत्रूचा पाडाव करण्याची तो खटपट करतो. त्यामुळे त्याचा मान राखणे हे पहिले काम. हा अभ्यासक म्हणजे जणू लांडगाच झाला होता. जंगलात हे लांडगे प्रस्थापित झाल्यानंतरही ह्याने लांडग्यांशी संपर्क ठेवलेलाच होता. हा केव्हाही तिकडे गेल्यावर लांडग्यांच्या भाषेत सूर काढून त्यांना बोलवायचा व त्याची साद ऐकून लांडगेही प्रतिसाद द्यावयाचे व धावत त्याला भेटावयास यावयाचे.
 याचा सारांश आपण काय काढू शकतो ? 'स्ट्राँगहार्टची कथा' ही अपवादात्मक होती का ? अल्सेशिअनचे पूर्वज लांडगेच. फक्त जंगली लांडगे थोडे मोठाड असतात. शेवटी सर्व विश्व एकरूप आहे. प्रत्येक प्राणी हा दुसऱ्या प्रत्येक प्राणीमात्राशी नाते संबंधाने जोडलेला असतो. सर्वांचा आत्मा एकच आहे हे तत्त्व उघड आहे. हे आत्म्याचे तत्त्व नुसते वैदिक संस्कृतीतच आहे असे नाही. जैन दर्शनामध्येही हा आत्मानुभव सांगितलेला आढळतो. भगवान महावीर आत्म्याविषयी निरूपणात असे सांगतात ३५ -