पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावना अतिशय तीव्र असतात. हे काही फक्त वैचारिक व मांसाहाराला वैचारिक विरोध एवढेच नसते. त्यामध्ये उन्नत मनाचाही मोठा भाग आहे. वारकरी सोडले तर आपले इतर शेतकरी काही पूर्ण शाकाहारी नाहीत. परंतु दुष्काळ पडला, जनावरे पोसणे अशक्य झाले म्हणजे ती खाटकाला विकताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात. ही काही नुसती आर्थिक बाब नाही. हजारो रुपये किमतीचा बैल मातीमोलाने विकावा लागतो या आर्थिक तोट्याबरोबरच त्या प्राण्यांच्या बरोबरचा सहवास व एकत्र कष्ट यातून निर्माण झालेला आपलेपणाही असतो. हे मानवाच्या बाजूचे झाले. प्राण्यांच्या बाजूने काय? समुद्रात बुडणाऱ्या माणसाला डॉल्फिन या माशांनी वाचवल्याची अनेक उदाहरणे आहेत. हेच काय वाघाला आपण अत्यंत क्रूर, रक्तपिपासू म्हणतो, ते किती खोटे आहे हे जिम कॉर्बेटने अनेक उदाहरणे देऊन दाखवून दिले आहे. तो शिकार करतो ती फक्त पोट भरण्यासाठी. त्याला बळी पडतात ते अशक्त, दुर्बल, आजारी असे प्राणी. नरभक्षक वाघसुद्धा माणसे मारतो ते पोटासाठी. कारण त्याला प्राण्यांची शिकार करता येत नाही. माणसांनीच त्याला व्यंग निर्माण केलेले असते. जिम कॉर्बेटने लिहून ठेवलेल्या दोन कहाण्याच आपण पाहू. या त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आहे.
 आपल्याकडे शेती पावसावर अवलंबून, त्यामुळे अनेक प्रदेशातील शेतकऱ्यांना हंगाम संपला की कामासाठी दूर जावे लागते. पण ते आपल्या मूळ गावाला विसरत नाहीत. शेतीच्या हंगामाला हमखास घरी परत येतात. महाराष्ट्रात सुद्धा अद्यापही मुंबईला असणारे 'नोकरदार' पावसाळ्यात शेतीसाठी, गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी परत येतात. हीच कहाणी उत्तर प्रदेशातही होती. एक गवंडी व त्याची पत्नी अशीच गाव सोडून दूरवर कालव्याच्या कामावर गेली होती. या दांपत्याला एक मुलगी व एक तिच्याहून लहान असा मुलगा अशी अपत्ये होती. नवरा-बायको दोघेही कामावर गेल्यावर त्यांच्या झोपडीच्या शेजारच्या झोपडीतच राहणारी एक म्हातारी या मुलांवर लक्ष ठेवीत असे. एक दिवशी पति-पत्नी सायंकाळी घरी आल्यावर मुले कोठे दिसेनात. म्हातारी म्हणते आतापर्यंत येथेच होती. रात्र पडली. नवरा दिवटी घेऊन रात्रभर भोवताली जंगलात हिंडून आला. दुसऱ्या दिवशीही असेच अपयश. भोवतालच्या सर्व लोकांपैकी कोणालाही काही कळेना, कारण त्यांना काहीच माहीत नव्हते. तीन दिवस झाले. नवरा-बायकोला जेवणही सुचेना. ३०