पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उलट त्यात वाढ तरी होते किंवा पूर्वी नसलेली चिंता निर्माण होते. जोपर्यंत 'मी', 'माझे', 'माझ्याकरिता' हा अहंभाव अस्तित्वात आहे तोपर्यंत ही चिंतातुरता वाढणारच. याला तशी बरीच कारणे आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणे आपण पाहू.

 यात पहिले कारण म्हणजे 'अपेक्षा'. अपेक्षा हे अहंभावाचेच एक रूप आहे. आपल्या नेहमीच्या व्यवहारातील उदाहरण म्हणजे बाप-लेकांचे. बाप मुलगा लहान असल्यापासून मुलाबद्दल काही अपेक्षा ठेवत असतो. आपल्याला जे आयुष्यात साधले नाही किंवा (त्याच्या मते) कुवत असूनही ज्या यशाचा लाभ झाला नाही ती वेळ मुलावर येऊ नये म्हणून या अपेक्षा असतात. यात त्याला आपल्या जीवनात (त्याच्या दृष्टीने) कुवत नसणाऱ्या माणसांनी आपल्यावर मात केली, पुढे गेले व मी मात्र कुजत राहिलो या दीर्घकाळच्या खेदाची भावनाही असू शकते. यातून मुलाला उत्कृष्ट मार्क मिळाले पाहिजेत, डॉक्टर झाले पाहिजे किंवा इंजिनिअर झाले पाहिजे, खूप पैसा मिळवला पाहिजे आणि म्हातारपणी मला त्याने सुखात ठेवले पाहिजे, ह्या अपेक्षा असतात. मुलाची कुवत, आवडीनिवडी यांना त्याच्या विचारात स्थानच नसते. त्यामुळे स्वतः व मुलगा दोघेही सतत ताणात असतात. याचा परिणाम म्हणून अपयशच पदरी पडते. यात त्याच्या कष्टाकडे लक्षच नसते. तेव्हा अपेक्षा इतकी छोटी ठेवावी की "बाळा यश देणे न देणे परमेश्वराचे हाती, पण कष्टात उणा पडू नकोस. मला त्यात समाधान आहे. " ह्याला आपण अपेक्षाविरहित प्रेम म्हणू. हेच उदाहरण आपण ईश्वर व आपण यात ठेवावयास पाहिजे. ईश्वरनिर्मित सर्व नियम मी पाळत आहे, जप, पूजा, ध्यान हे निर्विकार, अपेक्षारहित मनाने करत आहे, ही धारणा अंगी बाणली तर यशाचे प्रमाण वाढेल. निराशेमुळे येणारे ताण, त्यांचे दुष्परिणाम हे कधीच घडणार नाही. गीतेतील "कर्मेण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" हा श्लोक याचे सार आहे. आपण निसर्गाची लेकरे आहोत, त्याच्या नियमांनी बद्ध आहोत. पण आपण ते नियमच पाळत नाही व सतत ते मोडतच असतो. कायदा मोडला तर आपल्याला शिक्षा होणारच. पण मानवाने यासाठी न्यायसंस्था व कायदे निर्माण केले. येथे गुन्हा शाबीत झाला तरच शिक्षा होते. अनेक वेळा गुन्हा करूनही तो गुन्हा घडलाच नाही असे सिद्ध करणारे हुशार वकील त्या गुन्हेगाराला सहज सोडवतात. हा सगळा

३०३