पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सायंकाळ व उषःकाल यामधला कालखंड. रात्रीनंतर दिवस जर येतो तर मृत्यूनंतर पुनर्जन्म येतो या तत्त्वाला आपण अविश्वासार्ह गोष्ट का म्हणावयाचे? याला काही वैज्ञानिक आधार नाही, फक्त ही आध्यात्मिक संकल्पना आहे. त्यामुळे ही कल्पना असत्याच्या पायावर आधारलेली आहे हे म्हणणे बरोबर नाही. आपण एवढेच म्हणू शकतो की आज आपणास हे ज्ञात नाही. त्यामुळे त्याचे निश्चित होय किंवा नाही हे उत्तर देणे कठीण आहे. याबाबत आपण निःपक्षपाती असणेच योग्य ठरेल. आपल्या तत्त्वज्ञानातील 'आत्मा हा अमर आहे, देह नश्वर आहे' ही संकल्पना किती आश्वासक आहे हे आपण जाणून घ्यावयास पाहिजे.

 असे अनेक रुग्ण असतात की ज्यांचा मृत्यू अटळ असतो, या शेवटच्या दिवसांत त्यांच्या यातना कमी करणे व शांत चित्ताने त्यांना मृत्यूला सामोरे जाण्यास मदत करणे ही रुग्णसेवेची परिसीमा आहे असे मानण्यास हरकत नसावी. मनुष्य वाचणे अशक्य आहे असे म्हटल्यावर त्याला दया म्हणून मृत्यू द्यावा किंवा नाही हा एक अखंड चर्चेचा भाग आहे. परंतु त्याला मृत्यूला हसतमुखाने सामोरे जाण्याची शक्ती मिळवून देणे व त्याला सन्मानाने मृत्यू येणे ही सेवा श्रेष्ठ आहे. मृत्यू म्हणजे जीवनाची अंत्य घटना, शेवटचा क्षण. पण खऱ्या अर्थाने मृत्यू ही काही अंतिम घटना नसतेच. वेगळ्या अर्थाने आपल्या जीवनात रोज मृत्यू घडत असतो. पेशींचा मृत्यू व नवीन पेशींचा जन्म म्हणजे रोजचा वैज्ञानिक मृत्यू. पण यात आपल्या ध्यानातही येणार नाही असे मृत्यू आपण पाहत असतो, अनुभवत असतो. भोवताली आपले अनेक आप्त आपल्या डोळ्यासमोर मृत्युमुखी पडत असतात. ते दुःख कालांतराने नाहीसे होते, हे योग्यही. परंतु ही वेळ एक दिवस आपल्यावर येणार आहे व त्यासाठी आपली मानसिक तयारी होत नाही व शेवटी आपण भयग्रस्ततेचे बळी पडतो. हे प्रत्यक्ष मृत्यू होत. परंतु अशा मृत्यूची छोटी छोटी रूपे आपण कधीच ध्यानात घेत नाही किंबहुना ते आपल्या स्वप्नातही येत नाही. समजा, आपला बालपणचा एक मित्र शाळा-कॉलेज संपल्यावर नंतर एकदाही भेटला नाही व आयुष्याच्या सायंकाळी तो वारल्याची बातमी आली तर क्षणभर आपल्याला वाईट वाटते. पण खरे म्हणजे आपल्या जीवनात त्याचा मृत्यू ज्या दिवशी आपणास तो शेवटच्या वेळी भेटला त्याच वेळी झाला होता. अशा अनेक गोष्टी आपणास सांगता येतील. सख्खी भावंडे जर आयुष्यात भेटलेली नसतील तर त्यांचे अस्तित्व आपल्या दृष्टीने कोठे असते ?

२९८