पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सेवाधर्माला त्या जागत नाहीत हे उघड आहे. ह्या सर्व गोष्टींची खरी जरुरी का आहे हे त्या रुग्णाच्या स्थितीत मनाने गेले तरच कळेल. जेव्हा हृदयरोगाचा आघात होतो, हृदयशस्त्रक्रियेची जरुरी निर्माण होते, तेव्हाच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तो आपली मायेची माणसे, मित्र यांपासून वेगळा होतो, त्याला आधार तुटल्यासारखा वाटतो. त्याला फक्त ठराविक वेळीच भेटण्याची परवानगी असते. हॉस्पिटलचे वातावरणसुद्धा ताण निर्माण करू शकते. तेथील वेगळे वास, वेगळी गडबड व आपले पुढे काय होणार आहे ही भीती यामुळे रुग्ण खचण्याची भीती असते. डॉक्टर्स, नर्सेस किंवा इतर सेवकवर्ग घरच्या मायेनेच वर्तन करत आहेत, त्यांना आपली काळजी आहे ही भावना निर्माण झाली तर रुग्ण औषधोपचार असो वा शल्यकर्म असो त्या वेळी खूपच शांत मनाने त्याला सामोरा जातो. याच वेळी त्याने ध्यानधारणा किंवा अशीच मानसपूजा, जप, प्रार्थना आदी गोष्टी करणे डॉक्टरांच्या कार्याला पूरक ठरते. नर्सेस आपल्या वर्तनाने त्याला या गोष्टींना प्रवृत्त करून त्या कालखंडात अत्यंत जवळच्या नातेवाइकाची भूमिका पार पाडू शकतात.
पचनसंस्थेचे विकार :

 आपण प्रथम हृदयरोगाचा विचार केला याचे कारण म्हणजे आज तोच कर्करोगाचे खालोखाल घातक रोग आहे. पचनसंस्थेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे मुखावाटे घेतलेल्या अन्नाचे पूर्ण पचन करून त्यातून शरीराला लागणारी ऊर्जा, प्रथिने, क्षार, सूक्ष्म पोषक घटक, जीवनसत्त्वे ही मिळवणे व ती रक्तावाटे सर्व पेशींना पुरवणे. ह्या दोन गोष्ट जेव्हा पूर्ण संतुलित असतात तेव्हा आपले आरोग्य उत्तम राहते. आपण किती अन्न घ्यावे, त्याचा आराखडा कसा असावा हे थोडक्यात पुढे पाहू. परंतु आपली शारीरिक गरज वा मागणी व चयापचय यांत अंतर पडत असेल तर विकार उद्भवणारच. येथे ध्यानपद्धतीचा वापर करावयाचा असेल तर आपल्याला काय विकार आहे व तो संस्थेतील कोणत्या अवयवाशी निगडीत आहे, त्या अवयवाचे संपूर्ण चित्र आपले मनश्चक्षूंसमोर आणता आले पाहिजे. ते डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करावा. तसें हृदयविकारासारखे अचानक घात करणारे विकार पचनसंस्थेबाबत नाहीत. नाही म्हणावयास कावीळ हा एक असा विकार आहे

२८९