पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनात वादळ यावे व मोडतोड करून जावे, तसे अगदी बालपणापासून सुद्धा अशा मारक घटना घडत असतात. वैवाहिक संघर्ष, घटस्फोट, पती किंवा पत्नी यांतील एका जोडीदाराचा मृत्यू, व्यवसायातील वरिष्ठांच्या अपेक्षा व त्या आपण पूर्ण करू शकलो नाही तर अपेक्षाभंगाचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतील, या ताणाखाली सतत वावर, या गोष्टी खूपताण निर्माण करतात.
 मानसशास्त्र हे तसे म्हटले तर अनेक शास्त्रज्ञांच्या आयुष्यभर केलेल्या कार्याचे फल आहे. त्याची सखोल चर्चा अशी थोडक्यात करता येणार नाही. किंबहुना त्यासाठी प्रदीर्घकाल अभ्यासाची, चिंतनाची व अनुभवाची जोड असावी लागते. आपण येथे फक्त आरोग्य व तत्संबंधी दुष्परिणाम यांचाच थोडक्यात विचार करणार आहोत. आज व्यवसायव्यवस्थापन (Business Management) हा एक महत्त्वाचा विषय झाला आहे. औद्योगिक वाढीबरोबर रुग्णताही वाढीस लागली आहे. त्यासाठी आपल्या तत्त्वज्ञानातील ध्यानधारणा व आसन, प्राणायाम यांचा अतिशय उपयोग होतो हे सिद्धही झाले आहे. परंतु वैज्ञानिक स्तरावर याचा काय विचार झाला आहे याचे आपण थोडक्यात अवलोकन करत आहोत.
'ताणांचे व्यवस्थापन' :
 ताणांचे व्यवस्थापन म्हणजे जीवनातील सर्व प्रकारच्या ताणांना तोंड देऊन, दैनंदिन कर्तव्य पार पाडणे व मनाचा समतोल राखणे यासाठी करावयाच्या उपाय-योजना. आपल्या ताणांना तोंड देऊन, त्यांचे योग्य मूल्यमापन करून त्या निर्माण करणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी भरीव प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न म्हणजेच साधकवर्तन (Coping) होय. प्रत्येक व्यक्तीच्या सहनशीलता व क्षमता

वेगवेगळ्या असू शकतात. यापेक्षा त्या व्यक्तीवर जास्त दबाव आला तर आंतरिक व बाह्य संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष नाहीसा करणे, निदान क्षमतेच्या पातळीवर आणणे म्हणजेच साधकवर्तन. ही सहनशीलता वाढवणे हे खऱ्या अर्थाने समायोजन व त्याला अध्यात्माइतका साधा व दिसण्यात सोपा, परंतु प्रयत्नसाध्य मार्गच शेवटी उपयोगी पडतो. तात्त्विक चर्चा म्हणजे या राजमार्गावर प्रकाश टाकणे. साधकवर्तनास उपयोगी पडणाऱ्या साध्या साध्या गोष्टी याच बरेच वेळा त्याची साधने ठरतात. ती काय आहेत?

२७५