पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योगाचे अंतरंग मनुष्याला अफाट शक्ती देत असते. त्याद्वारा काय अशक्य गोष्टी साधू शकतात हे पतंजलींनी विभूतिपादामध्ये सांगितले आहे. ही शक्ती फक्त हृदयरोगच नव्हे तर अनेक विकार - अगदी कॅन्सरसुद्धा बरा करू शकते. ही शक्ती येण्यासाठी बरीच साधना करावी लागते. तेव्हा त्यावर वैद्यकशास्त्रानुसार नियंत्रित उपचार व योगसाधना यांचा मेळ घालणे हे जास्त व्यावहारिक ठरेल. तेव्हा स्वामी, गुरू किंवा त्यांचे विज्ञानवादी शिष्य आपणास फक्त अर्धसत्य सांगत असतात, हे पूर्ण ध्यानात ठेवावे म्हणजे आपला वेळ व पैसा यांचा अपव्यय होणार नाही. ह्या अष्टांगाचा अर्थ काय हे आपण समजावून घेऊ.
अष्टांगे म्हणजे खऱ्या अर्थाने व्रतेच आहेत. आपण ही आपल्या हितासाठी अंगीकारत असतो. तेव्हा "उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको" हा पारंपरिक सल्ला पूर्णपणे अमलात आणावयास पाहिजे नाहीतर अर्धवट काहीतरी करणे म्हणजे अभ्यास न करता देवाला नारळ ठेवून पास होण्याची आकांक्षा बाळगण्यासारखे फोल आहे. अनेक वेळा आपली जीवनशैलीच निसर्गनियमाविरुद्ध असते. लोभापोटी आपण अनेक अहितकारक गोष्टींना बळी पडत असतो. परंतु या गुन्ह्यांना शेवटी शिक्षा होतच असते. परमेश्वराच्या हातातील काठी दिसत नाही. पण ती पाठीवर पडली म्हणजे आपण कळवळण्याखेरीज काही करू शकत नाही. योग ही आध्यात्मिक साधनाच आहे. त्याला तात्त्विक विचारांची बैठक ही अवश्य असते. ही काही काल्पनिक गोष्ट नाही. तत्त्वचिंतन व साधना ह्यांचा अवलंब साधकाची जीवनशैली बदलू शकतो. ह्या गोष्टी अष्टांगामध्ये सांगितलेल्या आहेत. यम : अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे यम.
"अहिंसासत्यास्तेय ब्रह्मचर्यः ॥ २.३० ॥
 हिंसा करू नये, सत्य बोलावे व चालावे, चोरी करू नये, संयमित शरीरसुख घ्यावे, निष्कारण संचय करू नये ह्याच साध्या साध्या पण नियमित आचरणास कठीण अशा या गोष्टी आहेत. नियम : शौचसंतोषतपः स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ॥२.३२ ॥
 शौच्य म्हणजे शुद्धी, स्वच्छता. हे अंतर्बाह्य पाहिजे. स्नानाने बाह्य व योग्य

२५४