पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्त करण्यास पुरेसा आहे. पण त्या मंत्राप्रमाणे आचरण करणारा कोणी नसेल तर तो श्लोकही निरर्थक ठरेल." श्री. डी. जी. तेंडूलकर यांनी 'महात्मा' - भाग चार, पृ. १८८-१८९ यांत सत्य व अहिंसा याबद्दल गांधीजींचे विचार सांगितले आहेत. गांधीजींच्या ईश्वरनिष्ठेविषयी प्रसिद्ध लिखाण हा एक समुद्र आहे. पण ईश्वरनिष्ठा ही निरामय जीवनासाठी किती जरूर आहे हे आपणास सहज कळू शकते. ध्यानधारणा, पूजा ,जप, प्रार्थना अशा सर्व गोष्टी निरर्थक नाहीत असे विज्ञानवादी लोकही आज म्हणू लागले आहेत. ही ईश्वरभक्तीचीच वेगवेगळी रूपे आहेत. मानसचित्राद्वारा रोगपरिहार हेही एक ईश्वरप्रार्थनेचेच स्वरूप आहे. गांधीजींच्या ईश्वरनिष्ठेविषयी एवढे भरभरून लिहिणारे श्रीपादराव जोशी स्वतः ईश्वरनिष्ठ होते का, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. दि. २१ जाने. २००१च्या सकाळच्या पुरवणीत डॉ. व. दि. कुलकर्णी यांनी एक सुरेखसा, श्रीपादरावांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा लेख, हैदराबाद येथील 'आचार्य आनंदऋषी साहित्य निधी' या संस्थेतर्फे अहिंदी भाषी हिंदी लेखकांना दरवर्षी दिला जाणारा साहित्यपुरस्कार मिळाल्याबद्दल लिहिलेला आहे. श्रीपादराव हे बहुभाषाकोविद व बहुविध जीवनरीतींचे, समाजधर्माचे अभ्यासक. महाराष्ट्राबाहेर ते जेवढे प्रसिद्ध आहेत, त्यामानाने महाराष्ट्रात त्यांचे कार्य जाणणारे लोक कमी आहेत. असो. डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या या प्रदीर्घ लेखापैकी थोड्याशाच ओळी मी उद्धृत करतो. कारण त्या आपल्या विषयाशी निगडीत आहेत. डॉ. व. दि. म्हणतात-
  "दादा धर्माधिकारी, विनोबाजी, विमलाजी यांच्याशी आंतरिक मनोबंध असूनही ते अध्यात्माकडे चुकूनही वळलेले नाहीत, आणि पूर्णपणे गांधीवादी असूनही प्रत्यक्ष गांधीजींच्या किंवा एकूणच राजकारणापासून अगदी अलिप्त राहिले. पाण्यातील कमलपत्राप्रमाणे निर्लेप जगणं त्यांना कसं जमलं हे एक कोडंच आहे."

  पण ते अध्यात्मवादी नाहीत या शब्दांमुळे लोकांत थोडा गैरमसज होईल म्हणून माझा अनुभव सांगणे इष्ट ठरेल असे मला वाटते. श्रीपादराव हे पूर्णपणे आध्यात्मिक आहेत. माझ्या अध्यात्माच्या झालेल्या अभ्यासात व ज्ञानात श्रीपादराव व मधुकरराव याद या दोन आदरणीय मित्रांचा फार मोठा वाटा आहे. वर वर पाहता डॉ. व. दं.चे मत व माझे मत यांत विरोधही भासेल परंतु हा फरक मूलतः नाही.

२३५