Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रविवारच्या सुट्टीनंतर जेव्हा सोमवारी लोक कामावर जातात, तेव्हा अनेक व्यक्ती निरनिराळ्या प्रकारे प्रकृतीच्या तक्रारीच्या बळी ठरतात. ( अशा केसेस आपलेकडे नाहीत.) हृदयरोगाचे आघात जास्त प्रमाणात सोमवारी व त्यातही या तक्रारी सकाळी ९ वाजता होत असल्याचे आढळून आले आहे. हे आघात फक्त शारीरिक कारणामुळे असतात का? शारीरिक कारणे अनेक सांगण्यात येतात. सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त खाणे, सुरापान वगैरे होत असल्यामुळे हे होत असावे. खाण्यापिण्यामुळे अनेकांना 'वश्यतेला' (Allergy) तोंड द्यावे लागते. दुसरे म्हणजे रविवारी संपूर्ण . मानसिक ताणाच्या मुक्ततेमुळे तो दिवस आनंदात जातो. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी वेगळेपण काय ? सोमवार ते शनिवार दिनचर्येत काय फरक असतो ? सगळे वार सारखेच. हृदयविकाराची जी कारणे सांगितली जातात ती म्हणजे धूम्रपान, मधुमेह, कोलेस्टरॉलची उच्च पातळी वगैरे वगैरे. पण ही स्थिती तर बरेच दिवसांची असू शकते. शिवाय ह्या स्थितीतही व्यायाम करणारे, पळण्याचा व्यायाम घेणारे लोक आढळतातच. मग 'काळा सोमवार' (Black Monday) ही संज्ञा कितपत खरी आहे? यावर उपाय काय? एका पेशंटने दिलेले उत्तर असे आहे की "मी सोमवारी कामावरच जात नाही. मग 'काळ्या सोमवार' चा मी बळीही होऊ शकत नाही."

 व्यावहारिक स्तरावर त्या व्यक्तीला विशिष्ट नोकरी ही नाइलाज म्हणून करावी लागत असते, किंबहुना त्या कामाचा त्याला तिटकाराच वाटतो. दुसरे म्हणजे वरिष्ठांची सतत नाराजी व यांच्या अपेक्षेनुसार कार्य न होणे, काही नोकऱ्यांमध्ये कामाच्या तासांची व कार्यभाराची अनिश्चितता, अशा अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव होईल. त्या व्यक्तीला चांगल्या कामाबद्दल शाबासकी, कार्याबद्दल प्रेम या गोष्टी मिळत असतील तर ताणतणाव येऊच शकत नाहीत. तेव्हा या गोष्टींचा संबंध ना वाराशी ना शारीरिक स्थितीशी वा व्यक्तिगत समस्यांशी. कौटुंबिक व्यथा ह्यासुद्धा याला कारणीभूत असू शकतात पण त्यांचा 'काळ्या सोमवार' शी काहीही संबंध लागलेला आढळत नाही. ही शेवटी मानसिक समस्या असते. वार, वेळ, काळ किंबहुना शारीरिक स्थितीसुद्धा जबाबदार असतेच असे नाही. हे सत्य निदर्शनास येण्यास बराच काळ लोटावा लागला. पण हे हृदयरोगाच्या आघाताशी संबंधित असतेच असे नाही.

१९०