पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैद्यकशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे कोठल्याही रोगाचे निदान फार सत्वर करता येते. परंतु यातूनही स्वतः व्यवसायीच त्या रुग्णाला शाप देत असतो. या रुग्णाला "कर्करोग झाला आहे" याला "एडस्ने" ग्रासले आहे. डॉक्टर माणुसकीच्या नात्याने असे सांगत असले तरी यातून वाचण्याचे किंवा बरे होण्याचे प्रमाण निदान पन्नास टक्के (५०%) असेल, तरी पन्नास टक्के मृत्यू निश्चित असतो हेच ते सांगत असतात. त्या रुग्णाचे उरलेले आयुष्य तीन महिने, सहा महिने असे जेव्हा सांगितले जाते. तेव्हा हा 'शापित' रुग्ण त्या 'शापाशी' सहकार्य करून वेळेवर 'वैकुंठास' जातो.
 असेच दुसरे उदाहरण म्हणजे नोकरपेशाचे लोक. आयुष्यात त्यांना केव्हातरी निवृत्त व्हावेच लागते. ‘“जातस्यही ध्रुवोर्मृत्युः ।” तसे नोकरीची सुरुवात म्हणजेच निवृत्तीकडे वाटचाल. अनेक लोकांना नोकरीत असताना मिळणारा मानसन्मान, अधिकार याच्या आपल्या भोवताली असलेल्या घट्ट गुंफणीचा अर्थच समजत नसून तो मान, तो अधिकार त्या खुर्चीचा आहे हे ते विसरतात. पण हे घडत असतेच. काही नोकरदारांना निवृत्तीनंतर आर्थिक कारणास्तव मुदतवाढ हवी असते. पण भरपूर पैसा, बंगला, आयुष्य उपभोगण्यासाठी सर्व साधने असताना सुद्धा तो अधिकार, तो मानमरातब सोडणे म्हणजे या लोकांना जणू सामाजिक मृत्यूच भासतो. आजचे राजेरजवाडे म्हणजे राजकीय पुढारी. त्यांना खुर्ची येन केन प्रकारेण टिकवून ठेवावयाची असते. त्यासाठी ते कोठल्याही थराला जाऊ शकतात हे आपण पाहतोच. कारण मंत्रिपद जाणे. खासदार, आमदार हे सर्व त्यांत आलेच परंतु खेड्यातील ग्रामपंचायतीचा सभासदसुद्धा पुन्हा निवडून न आल्यास हा राजकीय मृत्यूच समजतो. कारण त्या पदाला मिळणारे अधिकार, सन्मान वगैरे नाहीसे होतात व समाज त्या खुर्चीत बसणाऱ्या नवीन व्यक्तीला या सर्व गोष्टी बहाल करतो.

 असाच एक आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवास येणारा प्रकार पाहू या. अमेरिका हे राष्ट्र तसे अगदी अलीकडचे. परंतु कल्पनातीत विकास, आर्थिक व लष्करी अफाट बळ यामुळे तिला आपण आदर्श मानतो. हे असूनही तेथील माणूस पूर्ण सुखी आहे का ? बालपणापासून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वैवाहिक जीवनही तसे आपल्या व्याख्येप्रमाणे आदर्श नाहीच. पण तेथील वृद्ध हेही एका अर्थी शापित जीवन जगत असतात. म्हातारपण हा त्यांच्यासाठी शाप ठरतो.

१८८