पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वे सुखिनः सन्तु । म्हणजे सगळे सुखी असतील तरच मी सुखी होईन असे समजावयास पाहिजे. सुखी जीवनामुळे जीवनकालखंडाचा अर्थच संपतो.
विकारातील मानवी सहभाग :
 आरोग्यामध्ये मानवाचा स्वतः चा सहभाग किती असतो ? मानवाचे मन, आणि प्रेम करणे, दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणे, दुसऱ्याची काळजी वाहणे, आजारी वा दुःखी व्यक्तीला हात धरून, डोक्यावर थोपटून धीर देणे, आणि सर्व प्रकारच्या आश्वासक क्रिया म्हणजे छातीशी धरणे, प्रेमाने सेवा करणे अशा अनंत भावनिक वर्तनाचा आरोग्यावर फारच सुपरिणाम होतो. फ्लॉरेन्स नायटिंगेलसारख्या परोपकारी नर्सेस, आई किंवा आईच्या मायेने सेवा करणाऱ्या स्त्रिया त्या व्यक्तीच्या आरोग्यावर केवढा सुपरिणाम करत असतात हे आपण जाणतो व अनुभवतोही. याउलट ज्यांना आपण षड्रिपू म्हणतो त्यांचा बरोबर याच्या कसा उलटा परिणाम ही आपण जाणतो. अतिसंतापाने स्ट्रोक येणे किंवा मृत्यू येणे, किंवा मुळे मृत्यू येणे या गोष्टी काही नवीन नाहीत. तेव्हा मन व भावना यांचे अपार साहाय्य आरोग्याला हितकारक ठरू शकते. ही अशी उदाहरणे, अशा गोष्टींचे प्रत्यक्ष अनुभवांस येणारे प्रसंग हे अत्यंत स्पष्टपणे, किंवा निर्विवादपणे शरीर व मन यांचा दृढ संबंध दर्शवतात.
 ही देहमनाची एकरूपता जीवशास्त्रीय दृष्टीने सुद्धा पाहता येते. ह्या एकरूपतेचा जेव्हा आपण विचार करू लागतो, निरनिराळ्या कहाण्या ऐकतो, काही प्रसंगांचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, तेव्हा त्यातून निर्माण होणारे चित्र आश्चर्यकारक असते. मुळातच आपण गृहीत धरतो की देह आणि मन हे दोन घटक वेगवेगळे आहेत व तसेच त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे.शास्त्र म्हणते की वैद्यकाचीही हीच संकल्पना आहे.परंतु मन व देह हे वरवरच नव्हे तर पूर्णार्थानि एकरूप आहेत.आयुर्वेदात विकाराचे मूळ प्रकृतिदोषांत शोधले जाते. होमिओपॅथीतही याच धर्तीवर म्हणजे विकाराचे मूळ तुमच्या शरीरात किंवा मनात शोधले जाते.परंतु आधुनिक वैद्यकात ते शरीराबाहेर शोधले जाते. अत्याधुनिक औषधांपैकी एक म्हणजे अँटिबायोटिक्स, अशी औषधे किंवा रोगप्रतिबंधक लशी यांच्या काही प्रमाणात मिळालेल्या यशामुळे त्या जीवाणूविरुद्ध लढायची ही हत्यारे झाली.त्यांचा सतत वापर म्हणजे दुरुपयोग.


१४४