पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंडित न होणारा प्रवाह आहे ही त्याची ठाम धारणा होती. जणू भूतकाळच परत वर्तमानकाळ होत होता. हे एक प्रकारे ताणरहित सुखी मानसिक जीवन होते. जे काही घडते ते सर्व व जे घडून गेले ते सर्व वर्तमान. या कल्पनांनी त्यांना निश्चितच अप्रतिम मानसिक स्वास्थ्य दिले असणार. वर्तमानकाळात केव्हातरी किंवा एकदाच घडणाऱ्या घटनांना त्या कालमानात स्थानच नव्हते.
 ही जी काल, हा अल्पकालीन नसतो, त्याला गती नाही, तो स्थिर आहे, या विश्वाच्या रचनेत जसा बदल होत नाही, तीच पृथ्वी, तोच सूर्य, तोच चंद्र त्याचप्रमाणे कालही स्थिर आहे, अशी आदिम मानवाची संकल्पना होती. पण ही गोष्ट त्या कालखंडापुरतीच मर्यादित होती असे नाही. नंतरही धर्मावर अपार श्रद्धा असणारे लोक, गुप्तविद्या जाणकार ह्यांचीही हीच अवस्था होती. ज्या घटना हजारो वर्षांपूर्वी घडल्या, काल घडल्या, उद्या घडणार आहेत, त्या सर्व अखंड वर्तमानकाळ आहेत, असे मानले जाई. हे लोकही असेच असतात आणि त्यांची मनेही आदिम मानवाचीच असतात म्हणण्यास हरकत नाही. त्यांना जन्म, मृत्यू, जीवन, आजार ह्या सर्व गोष्टी परत परत घडणा-या म्हणून फार विचार न करण्यायोग्य वाटत. या पार्श्वभूमीवर आपण आधुनिक माणूस पाहू. आपणही खऱ्या अर्थाने न संपणारा वर्तमानकाळ जगू इच्छितो. मृत्यू आजारपणातून येत असतो म्हणून आजारपण नको, त्यासाठी सतत औषधे, जीवनसत्त्वाच्या गोळ्या, टॉनिक्स यांचा शरीरावर सतत मारा करत असतो. कारण नसतानाही सतत निरनिराळ्या तपासण्या करून घेत असतो, वृद्धत्व म्हणजे फार मोठा शाप. वृद्धत्व म्हणजे 'संध्याछाया' त्या सतत ‘भिवविती हृदया’ ही स्थिती. तारुण्य टिकविण्यासाठी किती खटाटोप. केस पांढरे झाले, लावा कलप; टक्कल पडले, टोप लावा; चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, प्लॅस्टिक सर्जरी करून घ्या. स्त्रियांचे तर विचारूच नका. चेहरा उजळ दिसावा म्हणून तऱ्हेतऱ्हेची लोशन्स, पावडर्स, साबण अशा गोष्टींची यादीच पानभर होईल. हे सर्व आपण सुंदर, तरुण दिसावे म्हणून. पण काळ यांच्यासाठी थांबत नाही. आदिम कालखंडात काळ स्थिर तर आता मनोवेगाने धावणारा. असं म्हटलं जातं की घड्याळांचा जन्म झाला व घड्याळ म्हणजे मृत्यूच प्रतीक झालं आहे. घड्याळ आपल्याला मिनिटे गेली, तास गेले, दिवस गेले, वर्षे संपली याची सतत जाणीव करून देत असते. लक्ष सतत घड्याळाकडे. हे विशेषतः शहरात फार उग्र स्वरूपाने १३९