पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डलस येथील एक अत्यंत आधुनिक हॉस्पिटल. एक वृद्ध रुग्ण दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये होता. हा अत्यंत दुर्बल झालेला, भूक नष्ट झालेली, झोष येत नाही अशा स्थितीत आला होता. त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून काहीही निदान होईना. तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा 'बहुधा कर्करोग' असे निदान केले गेले होते. ही अवघड केस डॉ. जिम हा तज्ज्ञ हाताळत होता. त्या रुग्णाच्या वयाच्या व्यक्तींच्या बाबत कर्करोग हा नेहमी आढळणारा रोग. पण ह्या सर्व तपासण्यांमध्ये त्याचे काहीही चिन्ह आढळेना. अमेरिकेत औषधोपचार अत्यंत महागडे परंतु केस आली की ते डॉक्टर सर्वस्वाने त्या रुग्णाची सेवा करतात. डॉ. जिम हताश झाला.तो त्या रुग्णाची दिवसातून दोन वेळा गाठ घेत असे. नेहमीची फेरी चालूच होती.डॉक्टर जिम त्या रुग्णाला म्हणाला, “मित्रा, मी खूप प्रयत्न करतोय पण यश येत नाही. पण मी प्रयत्न सोडणार नाही. ते शेवटपर्यंत चालूच राहतील." यावर तो रुग्ण म्हणतो, “डॉक्टर, मला माहीत आहे की मी निश्चित मरणार आहे.कशाचाही उपयोग होणार नाही. कारण कोणीतरी माझ्यावर करणी केली आहे, मला भुताने पछाडले आहे.” हे ऐकल्यावर जिमला एक विचार सुचला. जणू डोक्यात वीज चमकावी असा हा विचार आला, जसे काट्याने काटा काढणे किंवा विषाने विष उतरवणे शक्य असते - तेच येथे का घडू नये ? प्रयोग तर करावयास हरकत नाही.भले ही रीत विज्ञानात बसत नसेल. शेवटी रुग्णाला बरे करणे हेच ध्येय असते.
 त्यांनी नेहमीच्या चोवीस तास वापरात असलेल्या सर्व जागा सोडून एक खोली रिकामी केली. तेथे त्या रुग्णाला आणला. 'मिथेनामाईन' हे अँटिबायोटिक पेट घेऊ शकते व हळूहळू जळते. हे मूत्रसंस्थेच्या विकारात वापरले जाते. त्यामुळे ते हॉस्पिटल वॉर्डमध्ये नर्सेस कॅबिनेटमध्ये सहज प्राप्त असते. तेथून जिमने त्या गोळ्या आणल्या. या सर्व गोष्टी अत्यंत गुप्त ठेवल्या होत्या. कारण यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही व अपयश आल्यास हसे मात्र होण्याची शक्यता. खोलीतील सर्व दिवे मालवण्यात आले. 'मिथेनामाईन'ची गोळी पेटवली होती. तिचाच जांभळट उजेड पसरला होता. एकूण वातावरण गंभीर, गूढ असे निर्माण झाले होते. तो रुग्ण ताठ बसून डोळे फाडून त्या गूढ ज्योतीकडे पाहत होता. जिमही तितक्याच गंभीरपणे सर्व हालचाली करत होता. जिमने तेथील एक कात्री उचलली व त्या रुग्णाच्या केसांचा एक झुबका काढून त्या ज्योतीवर ठेवला. केस जळू लागले व घाण वास १२७