पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पारडे जड होऊ नये म्हणून नैतिक व मानसिक -हास चालू आहे. याचा अर्थ वैद्यकशास्त्राचे बाबतीत असा लावता येईल की सेवा व प्रेम - ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाची जोडी आहे - त्यांचीच आज ताटातूट झालेली दिसते. यामुळेच वैद्यकशास्त्राची रोगपरिहाराची शक्ती खच्ची होत आहे. मायेने रुग्णसेवा होत नसल्यामुळे वैद्यक म्हणजे फक्त शरीराची जाण व रासायनिक उपचार.
  पूर्वी सिद्ध पुरुष किंवा अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व्यक्ती अनेक वेळा औषधाचा एक कणही न देता रोगपरिहार करू शकत असत. मंत्र, तीर्थ, अंगारा यांना स्वतःची अशी काहीही शक्ती नव्हती व आजही नाही. परंतु साधुपुरुष (आणि स्त्रियासुद्धा) रुग्णाची आस्थेने, मायेने विचारपूस करत असत यातून एक शक्ती निर्माण होत असे. तसेच त्या रुग्णाची शुद्ध, निरलस भक्ती असे, त्या भक्तीलाही एक शक्ती असते. या दोन गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा कोठलाही विकार नष्ट होतो. प्रेम व माया ही उन्नत मनाचीच रूपे आहेत. आणि मनाची शक्ती किती अफाट आहे हे आपण पाहिलेच आहे. हे भक्तिमार्गी लोक परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवत असत. परमेश्वर म्हणजे सर्व सद्गुणांचा महासागर. त्याला अनंत रूपे, अनंत भावना व अपरंपार शक्ती आहे. परमेश्वरसुद्धा फक्त एकच आहे. तो सर्व व्यापून उरला असल्यामुळे त्याच्या पलीकडे काहीच नाही. साधुपुरुष त्याचीच निर्भेळ भक्ती करून कार्य करत. यामुळे त्या ईश्वरी शक्तीची त्यांना देणगी मिळत असे व हीच त्यांची शक्ती सर्व परोपकाराची कामे त्यांच्याकडून सहज करवून घेत असे. सारांशाने असे म्हणता येईल की वैद्यकशास्त्र वजा प्रेम व माया म्हणजे शून्य बाकी उरते.
हस्तस्पर्शाने विकारमुक्ती  :

 डॉ. लीशान यांनी आणखी एक विकारमुक्तीचा प्रकार सांगितला आहे. हा प्रकार नेहमीपेक्षा जरा वेगळा आहे, असे ते म्हणतात (पण तसे ते नाही). यात तांत्रिक / सिद्ध पुरुष यांना या वेळी स्वतःच्या अंगात ऊर्जानिर्मितीचा अनुभव येतो. मग तो सिद्धपुरुष विकारस्थानावर आपले तळहात ठेवतो. या स्पर्शातून त्या रुग्णाला त्या स्पर्शावाटे आपल्या शरीरात उष्णता शिरत आहे अशी भावना होते. काही जण यालाच त्या सिद्धाच्या शरीरातून एक प्रकारच्या लहरी रुग्णाच्या शरीरात शिरत आहेत असे अनुभवाने समजतात. तर तिसरा प्रकार म्हणजे काही रुग्णांना

११४