Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओरडायची. एकदा काय झालं म्हणून घरमालकीण आली तर तिच्यावर उषानं तोंड टाकलं. तिन सावित्रीबाईना खोली खाली करा म्हणून नोटिस दिली. सावित्रीबाईंनी पुष्कळ गयावया केली पण तिनं ऐकलं नाही. ती म्हणाली, "तुम्ही काहीही कबूल करून काही फायदा नाही. ती तुम्हाला जुमानणार आहे का? मी पुष्कळ दिवस दुर्लक्ष केलं पण आता फारच झालं. बाकीचे भाडेकरू तक्रार करायला लागले.
 सावित्रीबाईंना रडू कोसळलं. उषा म्हणाली, "रडू नको आई. मी दुसरी जागा बघते. सबंध गावात काय येवढी एकच खोली आहे का?"
 "तुला कसं काही कळत नाही ग? देवा, माझी चांगली गुणाची मुलगी होती ती गेली. तिच्याबदली हिला नेली असतीस तर काय झालं असतं? आता ही आग पदरात घेऊन मी कसे दिवस काढू?"
 उषा रडायला लागली. रडत रडत तिनं आईला मिठी मारली, पण आईनं तिला रागाने दूर लोटली. "माझ्या वाईटावरच आहेस तू. इतका त्रास दिलास आता मिठी मारायला कशाला येतेस?".
 उषानं खरोखरच दुसरी खोली पाहिली. सामान न्यायला छकडा आणला. मायलेकींनी सगळं सामान आवरलं, छकड्यात भरलं, नव्या ठिकाणी खाली केलं, पुन्हा सगळी लावालाव केली. अरुणने मदत करायला बोट सुद्धा उचललं नाही.
 उषा म्हणाली, "बघ आई कसा आहे तो आणि तू म्हणतेस मी त्याला का बोलते म्हणून."
 "तो कसा आहे ह्याच्यापेक्षा तू कसं वागतेस ह्याच्यावर ध्यान दे जरा. तिथून आपल्याला हाकलून दिलं ते तुझ्या तोंडामुळे. आता तरी जरा नीट वागायला शीक.नाहीतर पुन्हा जावं लागेल इथून. सारखं नवीन जागा शोधत कुठे हिंडायचं?"

 उषा काम करायची त्या एका घरी तिथल्या बाईंची बहीण त्यांच्याकडे आली होती. तिची मुलगी तिच्याकडे बाळंतपणाला यायची होती आणि तिला घरकामात मदतीला आणि बाळ-बाळंतिणीचं करायला कुणीतरी हवं होतं. उषाच्या मालकिणीनं तिला विचारलं, "जातेस का त्यांच्याबरोबर मुंबईला? त्यांच्याकडे रहायचं. जेवूनखाऊन पगार देतील. तीन-चार महिने त्यांची नड काढ, मग परत ये" उषा म्हणाली आईला विचारून सांगते.

॥अर्धुक॥
॥४॥