पान:अभिवादन (Abhivadan).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्राचार्य अनंत सदाशिव आठवले । १०५


श्रद्धा नसणाऱ्या मंडळींच्या बाबतीतही हाच प्रकार आहे. देवावर श्रद्धा आहे, असे म्हटल्यामुळे एखादा माणूस वंदनीय ठरत नाही. कारण देवावर तरी तुमची श्रद्धा कशासाठी आहे हा प्रश्न शिल्लकच राहतो. माणसाची जात ही मोठ्या प्रमाणात स्वार्थपरायण आहे. बहुतेकांना देव लागतो तो या स्वार्थातून निर्माण होणाऱ्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी. पंढरपूरच्या देवळात उभा असणारा पांडुरंग हा त्यांच्या चरितार्थाचे साधनच असतो. आता अशी ही माणसे देवावर श्रद्धा असली म्हणून वंदनीय ठरतात, असे मला वाटत नाही.
  हा नियम जसा आस्तिकांना लागू आहे तसा नास्तिकांनाही लागू आहे. माझी देवावर श्रद्धा नाही, पण सोय आणि स्वार्थ हयावर मात्र श्रद्धा आहे असे जर एखादा नास्तिक म्हणू लागला तर तो लबाड आणि स्वार्थी माणूस केवळ नास्तिक आहे एवढयासाठी मी आदरणीय मानणार नाही. म्हणूनच मी असे मानतो की स्नेह असणे आणि नसणे, आदर असणे आणि नसणे हया गोष्टींचा आधार माणसाजवळ असणारी नैतिक संपत्ती असते. माझा धार्मिकांशी मतभेद असतो. पण ज्यांच्याशी मतभेद आहे ते सगळे आपले शत्रू आहेत असे मात्र मी समजत नाही. हया मुद्द्यावर जगातील सर्व धर्मश्रद्ध माणसांविषयी माझा मतभेद आहे. त्यांपैकी एक प्रमुख मुद्दा असा की, धर्म आणि ईश्वर माणसाला नैतिक ठेवण्यासाठी अपरिहार्य आहे असे धार्मिक लोक मानतात. जडवादाने जगातील माणसांना फार नीतिमान केले असे जरी मी मानत नसलो तरी धर्मश्रद्धा माणसाला नीतीमान करण्यात फारशी यशस्वी ठरलेली आहे असे मात्र नाही.
 मानवी जीवनात दोन प्रवृत्ती आहेत. एक प्रवृत्ती स्वतःच्या स्वार्थाच्या वर्तुळात अधिकाधिक रमण्याची आहे. ही प्रवृत्ती सार्वत्रिक असल्यामुळे माणसे कोणतीही बाब आपल्या स्वार्थाच्या रक्षणासाठी सोयीस्कररीत्या वापरतात. सर्व जगभर शेकडो वर्ष देव आणि धर्म असा वापरला गेलेला आहे. आणि देवधर्मच नव्हे, तर सर्व विचारच असे वापरले गेलेले आहेत. हयाविरुद्ध देव आणि धर्म हयांच्यावरील श्रद्धा स्वार्थाच्या परिघाचा छेद करण्यासाठी अल्प प्रमाणात वापरली जाते, ही दुसरी प्रवृत्ती आहे. कारण स्वतःच्या स्वार्थाबाहेर पडणे आणि समूहाच्या कल्याणाचा विचार करणे, या क्षणाच्या कल्याणाचा विचार न करता सर्वांच्याच कल्याणाचा दूरगामी विचार करणे हे ह्या दुसऱ्या प्रवृत्तीचे वैशिष्ट्य आहे. ज्या ठिकाणी माणसांमध्ये स्वतःचा स्वार्थ आणि सोय याच्या पलीकडे जाण्याची धडपड दिस लागते ते ठिकाण नैतिकतेच्या उदयाचे आहे.
 म्हणून मी धार्मिक माणसांकडे या पद्धतीने पाहतो. ही जी देवाधर्मावर श्रद्धा असणारी आणि इतरांना सश्रद्ध ठरण्याचा प्रयत्न करणारी मंडळी ही स्वतःच

अ...७