पान:अभिवादन (Abhivadan).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग . माडखोलकर । १०३



 मराठीतील वाङमयसमीक्षा अजून सर्वच मार्गांनी विकसित व्हायला हवी आहे. एखाद्या वाङ्मयकृतीचे त्या वाङमय प्रकारातील परस्परांशी संबंध, भोवतालच्या समाजाशी संबंध, कलावंतांच्या व्यक्तित्वाशी संबंध, कलावंतांच्या वाङ्मयीन व वैचारिक भूमिकांशी कलाकृतीचे संबंध अशा सर्वच बाजूंनी वाङ्मयसमीक्षा समृद्ध व्हायला पाहिजे. माडखोलकरांनी या विविधमार्गी अभ्यासाच्या दृष्टीने विपुल सामग्री उपलब्ध करून दिलेली आहे आणि इतरांना आपल्या जवळची माहिती उजेडात आणण्याचे धैर्य दिले आहे. हे कार्य काही कमी महत्त्वाचे नाही. मराठी वाङ्मयसमीक्षेला त्यांचा हा सारा उद्योग अनेक मार्गांनी समृद्ध करणारा ठरेल, यात मला शंका नाही.