पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा पनुरुक्ती अजिबात नाही असा माझा दावा आहे. प्रत्येक कथा त्या प्रश्नाचा वेगळा पैलू मांडते. प्रत्येक कथेचा 'व्हयू पॉईंट' भिन्न आहे. घटना आणि कथा-कथन एका कथेपेक्षा दुसऱ्या व सर्वच कथेमध्ये निराळे आहेत. संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर राग एक, पण प्रत्येक गाणं त्यावर आधारलेलं भिन्न भावना प्रगट करणारं असतं. तसंच या कथासंग्रहातील कथांचं आहे. यामुळे एका प्रश्नाचा व्यापक पट आणि आकलन ललित अंगानं वाचकांना होत जातं व तो जाणीव समृद्ध होत जातो, असं मला वाचकांच्या आजवर आलेल्या प्रतिक्रियांमधून जाणवलेलं आहे.
विनोद शिरसाठ :
 आता थोडं तुमच्या प्रशासकीय कामाकडे वळू या. कारण ते तुमच्या लेखनातून वेगळे काढता येत नाही. माझ्या मते प्रशासनात काम करताना तुमच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध हा बराच वेगवान राहिला आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, क्रीडा संचालक, जिल्हाधिकारी व फिल्मसिटीचे एम. डी. असा हा कालखंड आहे. या काळातला प्रशासक व पूर्वार्धातला प्रशासक म्हणून तुम्ही त्यात काय साम्य व फरक करता? तसा तो राहिला आहे का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 निश्चितच. कारण पूर्वाधात मी उपजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी म्हणून १७-१८ वर्षे खालच्या पदावर काम केले, तेथे विभाग प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असायचे. मात्र १९९६ साली मी आय.ए.एस. म्हणून पदोन्नत झालो व मी वर आपण म्हणलेली विभाग प्रमुखांची पदे भूषविली. हा उत्तरार्ध वेगवान यासाठी होता, की मला या प्रत्येक पदावर पदाची जी शासनविहित कामे आहेत ती करताना इतर अनेक सामाजिक व सांस्कृतिक कामे करता आली व काही 'आऊट ऑफ बॉक्स' उपक्रम राबवता आले.

 तथापी प्रशासकीय नोकरीच्या पूर्वार्धातही मला उत्तम काम करता आले. महसूल प्रशासनात असल्यामुळे पाणी टंचाई, दुष्काळ तसेच महापूर आदी, लेखक असल्यामुळे अधिक डोळसपणे संवेदनक्षमतानिशी कामे पार पाडली. नांदेड नगरपालिकेत मी आज ज्याला 'वन विंडो सिस्टीम' म्हणतात, ती तेव्हा सर्वप्रथम मी मराठवाड्यात सुरू केली होती व सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचा मी उच्चांक प्रस्थापित केला होता. स्वच्छता, पाणी पुरवठा व खड्डेविरहित रस्ते व शिक्षण आरोग्याचा दर्जा वाढविणे ही मूलभूत कामे केली. परभणीत असताना संपूर्ण साक्षरता अभियान यशस्वीपणे मुख्य संयोजक म्हणून राबवले व सुमारे सव्वादोन लाख प्रौढ खऱ्या अर्थाने साक्षर केले. त्यामुळे १९८१ साली स्त्री साक्षरतेमध्ये जो परभणी जिल्हा खालून

३३२ □ अन्वयार्थ