Jump to content

पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाले आहे असा कांगावा खुद्द हिटलरनेही केला होता. आजही आक्रमक असाच युक्तिवाद करतात. तात्पर्य, दोन्ही देश जगाचा विध्वंस झाला तरी चालेल पण काश्मिर प्रश्नी तसूभर मागे हटणार नाही. अशा जिद्दीने एकमेकांसमोर ठाकले आहेत.
 जगभर सर्वत्र राष्ट्रराष्ट्रातील विद्वेषाचा विखार पिढ्यान्पिढ्या जळत ठेवला जातो असे दिसत नाही. इंग्लंडपासून रशियापर्यंत सर्व युरोपीय देश एकमेकांशी शतकानुशतके महावैराची युद्धे झुंजत आले आहेत. या युद्धात प्रदेशच्या प्रदेश ओसाड झाले, लखावधी ठार झाले, जखमी अपंगांची मोजदादजच नाही. चालू शतकातही दोस्त राष्ट्रे विरुद्ध जर्मनी अशी दोन महायुद्धे घडली. युद्धाच्या काळात एकमेकांवर आगीचा वर्षाव करणारे देश आज युरोपीय संघटनेत सामील झाले आहेत. एकराष्ट्राच्या भावनेने सतत प्रगती करीत आहेत. जपान अमेरिकेची तीच परिस्थिती. दुसऱ्या महायुद्धात दोन्ही राष्ट्रे कमालीच्या कडवटपणे झुंजली. मनुष्यजातीच्या इतिहासातील सर्वात राक्षसी आणुबाँबचा हल्ला हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर झाला. क्षणार्धात लक्षावधी माणसे मृत्यूमुखी पडली. जपानला शरणागती स्वीकारावी लागली. पंतप्रधान तोजो यांना फाशी देण्यात आली; पण युद्ध संपताच चित्र झटकन बदलले. दोघांत काही संस्कृतीची समानता नाही. दोन देशांतील भाषांचे एकमेकांशी काही नाते नाही आणि तरीही, अमेरिका आणि जपान परममित्र असल्यासारखे सारे जुने विसरून नांदत आहेत. साम्यवादी रशिया आणि भांडवलवादी अमेरिका यांच्यापेक्षा अधिक कडवे वैर जगाच्या इतिहासात कधी झालेच नाही; पण लोखंडी पडदा फिटला आणि ही दोन्ही राष्ट्रे कमालीच्या सलोख्याने, गुण्यागोविंदाने संबंध ठेवीत आहेत. आयर्लंडमधील वाद संपत आहेत. दक्षिण अमेरिकेतील वंशविद्वेषाची व्यवस्था फाळणी झाली पूर्व जर्मनी समाजवादी रशियन आधिपत्याखाली समाजवादी बनला, तर पश्चिम जर्मनी भांडवलशाही व्यवस्थेचा आदर्श नमुना मानला गेला. हिंदुस्थान-पाकिस्तानचे जसे उभे वैर तशीच स्थिती पूर्व-पश्चिम जर्मनीची ही दोन शकले पुन्हा एकत्र झाली. आज एकसंध राष्ट्र म्हणून भूतकाळातील सर्व कडवटपणा विसरून सलोख्याने राहत आहेत. वर्षांनुवर्षे सापमुंगसाप्रमाणे झुंजलेले देश आपापल्या भूमिकांविषयीचा अट्टाहास सोडून नव्या मार्गाने आंगकूच करीत आहेत.

 विकसित संपन्न राष्ट्रातील लोक जुन्या चिघळणाऱ्या वादांवर वेळ आणि शक्ती व्यर्थ घालवीत नाहीत. काही व्यावहारिक तोडगा शोधून काढतात. समझोता

भारतासाठी । १९८