गुरुस्तुतिमुक्तांजलि

विकिस्रोत कडून

श्रीगुरुचरणस्मरणप्रणतिस्तुतिदर्शनार्चनश्रवण येथेंचि हृदय संतत संत तरति करुनिया अतिप्रवण. ॥१॥ श्रीगुरुचें चरनाबुजरज जें, तें मुख्य होय मंगल गा ! अंगलघा सिद्धि सदा याच्या; याचाचि धरिति संगलगा. ॥२॥ श्रीगुरुचरणोदक हें तीर्थांचें जनक; विप्र या गाती. ‘ याची सुकीर्ति ’ म्हणती ‘ न ’ ज्ञाते जन कवि ‘ प्रयागा ती. ’ ॥३॥ श्रीगुरुराज वदान्य; प्रणति करिति सर्व कल्पनग यातें. जें हा प्रणतां देतो, जीवांला शेषतल्प न, गया तें. ॥४॥ श्रीगुरुकडे भवमहाव्यसनीं गुरुभक्त चित्त पाठउनी, होय सुखी, हेमंतीं देउनि शीतार्त जेंवि पाठ उनीं. ॥५॥ गुरुभक्ता बहु मानी, हंस भजे मानसा सरला जो. श्रीगुरुला श्रीपतिचा करिता बहुमान सासरा लाजो. ॥६॥ श्रीगुरुच्या कीर्तीची, ज्योत्स्रेची, सम म्हणों नको रीती. अतिधवळा हे होती, केवळचि वही म्हणोन कोरी ती. ॥७॥ श्रीगुरुची, चंद्र अमृतकर म्हणति परि, न बराबरी लाहो; याची प्रबोध पावो, कीं पात्र गुणें बरा बरीला हो. ॥८॥ दोषाकरा जडात्म्या आणिल गुरुच्या नवीन समतेला, सारासारज्ञाता न म्हणे हय्यंगवीनसम तेला. ॥९॥ गुरुभक्तांत नव्हे, जो म्हणता गुरुराज तपन - सा, मान्य, नाशी गुहातम न. मग कैसें तत्तेज तप न सामान्य ? ॥१०॥ श्रीगुरुचें नुरवी परदर्शन सुखसदन ताप दासांचे. कामादि शत्रु जे जे, त्यांतचि गुरुपदनतापदा, सांचे. ॥११॥ श्रीगुरुनें लीळेनें सर्व श्रुतिशास्त्रसार पढवीलें. ध्रुवबहुमत परमपदीं, रंकांतें कर धरूनि चढवीलें. ॥१२॥ श्रीगुरुचा प्रेमा जो म्हणती करिजेल तो कवि न तातें. वात्सल्यभरें भावी केवळ कळवळुनि तोक विनतातें. ॥१३॥ श्रीगुरु - अधिक, सुखविलें जें पोषुनि काय, न, मन माते तें. कोप न याया शतदा मीं न करिन काय नमन मातेतें ? ॥१४॥ श्रीगुरुच्या सोडावें न नता प्रेमें, जसें नभा वातें. इष्टा मित्रा सुहृदा आप्ता सख्ख्याहि ये न भावा तें. ॥१५॥ श्रीगुरुच्या उक्तिसमा नुति मजि म्हणेल कामकपिला जो, पशुता कल्पुनि चित्तीं तोही म्हणतां न रामकपि लाजो. ॥१६॥ श्रीगुरुला ‘ चिंतामणि ’ न म्हण जिभे ! शब्द मान; दगड दया - काय करिल ? न पडों दे श्रीगुरु पदरेणु मानद गडद या. ॥१७॥ श्रीगुरु न स्पर्शमणिहि, कीं तोहि तयाचि सारिखा; परिस निवडहि करितो, लोह स्वीकारी, दूर सारि खापरिस. ॥१८॥ श्रीगुरुचें वचनामृत त्या अमृताहूनि अधिक; या सुरसा सेउनि, इतरा न रसा नर साधायासि तळमळे सुर - सा. ॥१९॥ श्रीगुरुचे जे, त्यांच्या कामाद्युग्रारि साहती लत्ता. गुरुभक्ताची चाले त्या काळावरिहि सर्वदा सत्ता. ॥२०॥ श्रीगुरुचरणाची जी संख्येयाखिलगुणा न धूलिहि ती. मोजावयासि असतें शक्य तरि, कधींच विधित्रधू लिहिती. ॥२१॥ श्रीगुरुनें क्षणभरि जें द्यावें सुख किमपि दंभरहितातें, तें देइजेल न सुता, विधि होउनि कल्प शंभरहि, तातें. ॥२२॥ श्रीगुरुपदसरसिज जें तदुपासकचित्त बंभरचि तें हो ! गुरुयशसें न इतरसुख; अमृत - तसें काय अंभ रचितें हो ? ॥२३॥ श्रीगुरु हा भवसिंधुप्राशनकरिता महाघटज नांदे. जनिमरणपथश्रांतां, पर सुख, पांथां जसा वट, जनां, दे. ॥२४॥ श्रीगुरु हा चतुरानन चतुरासि नव्या नव्याचि सृष्टींत किति न चमत्कृति दावी ? प्रकटाया प्रेमबाष्प दृष्टींत. ॥२५॥ श्रीगुरु हा नारायण सत्कीर्तिश्रीनिवास अवतारी. जो घन साधुवनातें, शमवुनि नि:शेष पापदव, तारी. ॥२६॥ श्रीगुरु शंकर, येणें सुदृढ स्वानुभवभव्यचापधरें भस्म क्षणांत केलें देहपुरत्रय सुतीक्ष्ण बोधशरें. ॥२७॥ श्रीगुरु शक्र, विचाराशनिपातेंकरुनि मोहवृत्रास मर्दुनियां, दूर करी दु:सह देवादिदेहभृत्त्रास. ॥२८॥ श्रीगुरुचि लोकपाळक साक्षाद्यमधर्म वरूण वित्तप हा. ‘ सत्य स्वनुभवातें ’ श्रुति म्हणति, ‘ स्थिर करूनि चित्त, पहा. ’ ॥२९॥ श्रीगुरुपदप्रसादें श्रीगुरुचा जाणतात महिमा, ते म्हणति, ‘ अनंता अचळा गुरुमूर्तिच तूं, असी न महि माते ! ’ ॥३०॥ श्रीगुरुमातेनें निजहृदयीं निववूनि आवळीला जो, माता परेसि म्हणतां, तो , धात्री जेंवि आवळी, लाजो. ॥३१॥ श्रीगुरु समर्थ लोकीं; श्रीगुरुचि पडों न दे नता शोकीं. श्रीगुरु चिन्मय तो, कीं श्रीगुरु समबुद्धि अरिजनीं तोकीं. ॥३२॥ श्रीगुरु शास्त्रपुराणश्रुतिसज्जनशतमतें असामान्य. श्रीगुरु जसा कविजना, विश्वांत दुजा नसे असा, मान्य. ॥३३॥ श्रीगुरु माय, श्रीगुरु तात, श्रीगुरु धणी परित्राण. श्रीगुरु वित्त, श्रीगुरु विद्या, श्रीगुरुचि जीवनप्राण. ॥३४॥ श्रीगुरु सनत्कुमार, श्रीगुरु नारद, जयासि कवि गाती. श्रीगुरु वाल्मीकिमुनि, श्रीगुरु शुक, ज्यासि सन्मुनि ध्याती. ॥३५॥ श्रीगुरु कपिलाचार्य, व्यास, पराशर, वसिष्ठ, गाधिज. या श्रीगुरुमूर्ति ध्याव्या, गाव्या, याव्या मुखासि आधि - जया. ॥३६॥ श्रीगुरुचरणांसि पथीं नच कंटक, कीं शिरीं खडा वाहो. गुरुभक्त म्हणे ‘ जीवा ! मुक्त न हो, गुरुपदीं खडावा हो. ’ ॥३७॥ श्रीगुरुला जी कांहीं सेवा, सुखसंपदा नवि नवी; ती. मागति गुरुभक्त; दुजी जोडाया कंपदा न विनवीती. ॥३८॥ श्रीगुरुचे चरण शिरीं नित्य धरुनि, गा. त्रपा दुकानातें देती श्रीच्या; यांसीं लाविं, करुनि गात्र पादुका, नातें. ॥३९॥ श्रीगुरुतेंचि भजावें, नमन करुनि, धरुनि मुक्तिच्या चिबुका. व्हावें चंदन, किंवा कासे लागोनि युक्तिच्याचि, बुका. ॥४०॥ श्रीगुरु सेविन, होउनि मृगमद, कर्पूर, केसर, अबीर, या जडपणासि माज्या बहुबहु मानील मुक्तहि कबीर. ॥४१॥ श्रीगुरुतेंचि भजावें प्रेमें, होवूनि बा ! शुभ व्यजन. स्वीकारील असें जडपण, तो पावेल आशु भव्य जन. ॥४२॥ श्रीगुरुच्या सेवेतें सोडुनि, मीं मुक्तितें भुलेंन्बा कीं. तींत न हें सुख. येथें व्हावें तैसेंचि म्यां फ़ुलें नाकीं. ॥४३॥ श्रीगुरु कामद म्हणउनि, धरिली म्यां हे मनांत आस नतें. हांसोत संत, व्हावें ज्यावरि गुरुमूर्ति भव्य, आसन तें. ॥४४॥ श्रीगुरुतें स्पर्शाया व्हाचा तद्वस्त्रपात्र, हा टोपी. परमवदान्यापासीं अर्थीं न मनोरथास आटोपी. ॥४५॥ श्रीगुरुभक्त म्हणेल ब्रह्मयासि ‘ तुझेंहि पद नको. राया ! ’ गुरुपद गुरु पद व्हावें, करुनि नवस, यवस रदन कोराया. ॥४६॥ श्रीगुरुचें व्हावें जें लोड, उशी, दार, सुत, पलंग, डबा. ‘ सांनिध्यार्थ चरण घे मोडूनि ’ म्हणेल सुतप ‘ लंगड बा ! ’ ॥४७॥ श्रीगुरुसि आवडे जो, पावावें त्याचि सुरस महिम्यातें. जें नावडे, न घ्यावें रूप क्षणमात्र सुरसमहि म्यां तें. ॥४८॥ श्रीगुरुचा भाट बरा. प्राप्त स्तुतिरूप सुरस भाटा कीं. कवि म्हणति, ‘ हें न घडतां, जी जी म्हणतीहि सुरसभा टाकीं. ’ ॥४९॥ श्रीगुरुला स्तवितां सुख, तें काना न निज आलिया, स्तवन स्वनुतिस गुरुभक्तश्रुति सन्मतिच्या म्हणति आलि यास्तव ‘ न ’ ॥५०॥ श्रीगुरुचें जो कोणी, जाया सर्व प्रयास, पद रगडी, पुरुषार्थ सकळ त्याचे होती, पसरुनि तयास पदर, गडी. ॥५१॥ श्रीगुरुचे जो भगवद्गुणसे प्रेमें द्रवोनि गुण गातो, श्रीचा, सुकीर्तिचा, किंबहुना सन्मुक्तिचाहि कुणगा तो. ॥५२॥ श्रीगुरुच्या भजनसुखें क्षण देहाचा जया पडे विसर, त्याच्या षडरातींचा हा ! हा ! हा ! हा ! म्हणे, रडे विसर. ॥५३॥ श्रीगुरुवचनासि, जसा चातक मेघोदकासि, आ पसरी, न करील तद्यशाची त्या श्रीसुरसिंधुचेंहि आप सरी. ॥५४॥ श्रीगुरु भावें वंदुनि जेणें सानंद घातला उजवा, तीर्थें म्हणती पाहुनि त्या ‘ स्वात्मा, समय पातला, उजवा. ’ ॥५५॥ श्रीगुरुला जे शरण न जाती, त्यांला घडेचि ना सुगती. पावति नच शोभा ते. भाते - से, धरुनि मद, वृथा फ़ुगती. ॥५६॥ श्रीगुरुगुणहंसां न, प्राकृतगुणगृध्रवायसां, गाल, तरि धर्म पुसेल तयां; चुकवाया दंड, काय सांगाल ? ॥५७॥ श्रीगुरु पाहे, नुरवुनि तिळभरिही भेद, सारखे दास प्रणतांच्या शमवि श्रीगुरुचें वच - वेदसार खेदास. ॥५८॥ श्रीगुरुचें यश, जो जन सुमंलिन, मानूनि तोक या, धूर्तें. गुरुभक्त म्हणुनि तारी कनककशिपुतेंहि तो कयाधूतें. ॥५९॥ श्रीगुरुपदप्रसादें ध्रुवबाळें सुपद जोडिलें अढळ. इछितपदार्थदानीं कोणाचा हात बा ! असा सढळ ? ॥६०॥ श्रीगुरु वसिष्ठ केला श्रीरामें हें न काय आइकसी ? तरती, कपिलातें जरि गुरु न करिति, देवहूति आइ कसी ? ॥६१॥ श्रीगुरुवांचुनि वांचुनि विफ़ळ जिणें. यांत बांकडें काय ? शुक सांगे भागविला कृष्णें, आनोओनि लांकडें, काय. ॥६२॥ श्रीगुरुसांदीपनिची भार्या आर्या वदे, तदाज्ञा ते बळ -कृष्ण मानिति जसी श्रुतिची आज्ञा तसी तदा ज्ञाते. ॥६३॥ श्रीगुरु ज्यातें तारी संसाराब्धींत, संत तोचि तरे. श्रीगुरुसि शरण जाणें चित्ता ! हें होय संततोचित रे ! ॥६४॥ श्रीगुरुच्या शाश्वत सुखरूपी चरणींच, जेंवि पंगु, रहा. चित्ता ! भवविभवातें न भुलें. अत्यल्पकाळ भंगुर हा. ॥६५॥ श्रीगुरु अनिळाsनळ - सा, पापनिकर वाळला जसा पाला. गुरु दे भवा, जसा खगपतिनखकरवाळ लाज सापाला. ॥‍६६॥ श्रीगुरुच्या मूर्तिवरुनि जरि ओंवाळूनि सांडिला काय, तरि ऋण न फ़िटे. तेथें स्तव भलतासाचि मांडिला काय ? ॥६७॥ श्रीगुरुराया ! ठाव्या बाळा धड काय या स्तवनरीते ? न अव्हेरिलीच गोपी कृष्णें जडकाय यास्तव नरी ती. ॥६८॥ श्रीगुरुराया ! हा या पायाला याचितो करुनि नमनें, कीं क्षणहि, यासि सोडुनि, जावें विषयस्पृहा धरुनि न मनें. ॥६९॥ श्रीगुरुदेवा ! सेवा घे वात्सल्येंकरूनि अनवरत. मन वर तव दासाचें हा पावुनि हो जसेंचि अनव रत. ॥७०॥ श्रीगुरुमाते ! न तुझें मन निष्ठुर देवसिंधुसखि ! लेश. तो त्वप्रसाद म्हणती वेदपुराणें जयासि अखिलेश. ॥७१॥ श्रीगुरुवर्या ! दे तें, मर्यादेतं न शील जें मोडी. थोडीहि मनें, विष या विषया जाणुनि, धरूं नये गोडी. ॥७२॥ श्रीगुरुराजा ! नसतां तवपदशरणागतीं असुख - लेश, सादर भजतिल न तुतें, तरि न रहावेचि हे असु खलेश. ॥७३॥ श्रीगुरुनाथा ! गाथा तव सुयशाच्याचि रविसमा गाव्या. रचितों मींच सकळ गुरु. पर कोणा रचुनि कविस मागाव्या ? ॥७४॥ श्रीगुरुवरा ! वराभयदात्या ! रक्षीच माय चुकलीला. गातों तुझ्या यथामति मीं प्रेमें, जेंवि गाय शुक, लीला. ॥७५॥ श्रीगुरुराया ! शुद्ध ब्रह्माचि तूं. नर न, दिससि जरि नर - सा. तक्र तसें दुग्ध दिसे; दोहींच्या किमपि साम्य परि न रसा. ॥७६॥ श्रीगुरुराया ! दिसला गोपांच्या बाळकांत बाळक - सा; म्हणुनि म्हणावा, कळतां तेज, पशुपबाळ विश्वपाळ कसा ? ॥७७॥ श्रीमद्रुरो ! दिसे श्रीदत्त म्हणुनि योगिनायक पिसाच. मारुति कपि - सा दिसतो, यास्तव तो होय काय कपि साच ? ॥७८॥ श्रीगुरुराया ! उपमा नाहीं तुज, हें तुजें तुजचि समजे. ते न बधतीच, झाले, भजुनि तुज स्वात्मदा, तुजचि सम जे. ॥७९॥ श्रीगुरुनाथा ! माथा लववुनि, हा दास बोलतो कांहीं. बोलावेचि शिकविले, हृदविनोदार्थ, बोल तोकांहीं. ॥८०॥ श्रीगुरुराया ! उपमा योजावी विष्णुची तुला, तरि तो मायापति, तूं मायाहर, हा गुण मम मना मना करितो. ॥८१॥ श्रीगुरुराया ! माया, पायाला या भिऊनियां, पळती, श्रीवुष्णु जिला आश्रय झाला, न टिकेचि तुजपुढें पळ ती. ॥८२॥ श्रीगुरुराया ! करितो परिपूर्ण तुझा अनुग्रह रित्यातें. उग्र कनककशिपुसि, जो तत्सुत, झाला अनुग्र हरि, त्यातें. ॥८३॥ श्रीगुरुराया ! ज्या तूं होसी, होती प्रसन्न त्या सर्व; जैसे सुर पार्थातें झाले, होतां प्रसन्न तो शर्व. ॥८४॥ श्रीगुरुराया ! अंतर्बाह्य न अन्यत्र सर्वथा नातें. आया - बाया, माया दाविति, देती न सर्व थानातें. ॥८५॥ श्रीगुरुराया ! कथिली जी त्वां कर्णांत हे तुजी वाचा चतुरक्षरा, इणें तो हरिला, जो मोहहेतु जीवाचा. ॥८६॥ श्रीगुरुराया ! बा ! या तुझिया नमितांचि पादराजीवा, शिवता - स्वयंवरवधू घालितसे माळ सादरा जीवा. ॥८७॥ श्रीगुरुराया ! जाया आयासा या स्वजन्ममरणाच्या, स्मरणाच्या कासेला लागावें बा ! तुझ्याचि चरणांच्या. ॥८८॥ श्रीगुरुराया ! न शिवे ताप कधीं तव पदास शिवल्याला. अंतर्बाह्य निरंतर बा ! कोण तुझा न दास शिव ल्याला ? ॥८९॥ श्रीगुरुराया ! ‘ दीनं मामव ’ म्हणउनि पदास शिवला जो, म्हणसि भ्रम स्मरुनि तो उमजुनियां आपणासि शिव लाजो. ॥९०॥ श्रीगुरुराया ! म्हणवी जीवदशा ‘ हाय ! ’ कविस भाजी जी; तीच शिवमयी केली; तरिच तुला आयकवि सभा ‘ जी ! जी ! ’ ॥९१॥ श्रीगुरुराया ! त्वां दृढ कंठींचा पाश अनव सरकविला. ऐशा तुज न भजाया संसारीं कोण अनवसर कविला ? ॥९२॥ श्रीगुरुराया ! तूं श्रीकृष्ण, तुझा तत्वबोध हा वेणु, श्रोतृश्रुति गोपी, व्रज सद्व्रज, नत तोचि पदकमळरेणु. ॥९३॥ श्रीगुरुराया ! प्रेमें सेवावे म्याम तुझे सदा चरण. हें मात्र न सोडावें, जोडावें निश्चयें सदाचरण. ॥९४॥ श्रीगुरुराया ! टिकला शिकलाहि अलोल कीर हा. यास पदपंजरीं कथितसे चिरकाळ अलोलकी रहायास. ॥९५॥ श्रीगुरुराया ! वत्सलसागर तूं सर्वदासमैनाकीं. शिक्षित किमपि वदे ती बहुमान्या प्रभुसि होय मैना कीं. ॥९६॥ श्रीगुरुराया ! कवणा संसारीं स्पर्शला अनय नाहीं ? स्खलनावांचुनि केलें गमन न विषयीं पथीं अनयनाहीं. ॥९७॥ श्रीगुरुराया ! पावे, ज्यातें पावोनि चित्त आधीतें, बा ! मज तव प्रसादें, न रुचो स्वप्नींहि वित्त आधीं तें. ॥९८॥ श्रीगुरुराया ! नियमें बुडवुतसे वाहत्यासि गर्व तमीं. चरणीं असेंन होउनि रज कीं बोधार्णवांत पर्वत मीं. ॥९९॥ श्रीगुरुराया ! द्यावें ज्ञान भजाया, जना न सांगाया. कां गाया लावील न तुज, तें यावें अभाग्य आंगा या ? ॥१००॥ श्रीगुरुवरा ! रविकरानुगृहीत सुपूर्ण इंदु होय जरी, रविसम तम शमउनि, सुनिपुणगुण तो न प्रकाश तेंवि करी. ॥१०१॥ श्रीगुरुराया ! पडते मागुनि, घेऊनि जरि उणीव, रिते तरि ते दासत्व, गळां, पायांच्या पडुनि, कां गुणी वरिते ? ॥१०२॥ श्रीगुरुरया ! व्हाया जलधिच जलधींत मेघबिंदु निघे, गुरुभक्तिरसज्ञ न तो, गंगावदनेम नद्यांत निंदुनि घे. ॥१०३॥ श्रीगुरुराया ! माझी हे आवडि आळ बा ! पुरीव. सती अर्धांगीं आहे कीं. वैकुंठाख्या कसी पुरी वसती ? ॥१०४॥ श्रीगुरुराया ! ज्या या जायासुतवित्तसंपदा, साच्या कृत्याशा अत्युग्रा देती हृदयासि कंप दासाच्या. ॥१०५॥ श्रीगुरुराया ! त्या ती बाधों न दिली सुदर्शनें कृत्या. चालुं न द्यावें मजवरि संसृतिच्या या सुदर्शनें कृत्या. ॥१०६॥ श्रीगुरुराया ! ‘ स्वयशा ’ जरि ‘ हंस करावया, अहंसा धू ’ ऐसें सांगसि, अद्भुत करिसि, तरि न म्हणसि तूं ‘ अहं साधु. ’ ॥१०७॥ श्रीगुरुराया ! त्यजिना मीं तवपदभजनमानवेशपथा. करितां या पायांच्या, कोण कुशळ न जन मानवे, शपथा ? ॥१०८॥ श्रीगुरुराया ! नलगे भजनेतर म्हणुनि आण वाहूं द्या. प्रभुजी ! जें बहुमत, तें मज बाळचि गणुनि आणवा, हूं द्या. ॥१०९॥

उपसंहार ( गीतिवृत्त )

अष्टोत्तरशतसंख्या या स्तुतिरूपा, मुनिर्मळा, मुक्ता श्रीगुरुरामपदाब्जीं नमुनि मयूरें समर्पिल्या युक्ता. ॥११०॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.