कशाला उगीच दुखवा ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> अहो कोण विचारतो हेडक्लार्कला ! कसे दिवस काढीत आहोंत हें आमचें आम्हांलाच ठाऊक. म्हणायला हेडक्लार्क ! सत्ता पाहिली तर काडीइतकी देखील - घ्या, पान घ्या - बा ! नानासाहेब ! हें काय बोलणें ! अहो परिचय म्हणजें कांही थोडाथोडका नाहीं ! डलर्ड हायस्कुलांत असतांना रोज मधल्या सुट्टींत - आठवतें का ? - आपण एकत्र बसून चिवडा खाल्लेला आहे ! मोठे गमतींत दिवस गेले नाहीं ? - कोण सुंदरे ? काय आहे ग ? मला खालीं बोलावलें आहे ? आलों म्हणावें अं ! - कांहीं विशेष नाहीं. बसा. जरुरीचें काम आहे ? मग काय बोलणेंच खुंटलें ! भेट का ? सकाळी किंवा रात्री - केव्हांही होईल. - नको ! तें नको आतां सांगायला ! नव्याण्णव हिश्शांनी हपीसांतली जागा ही तुमच्याच मुलाला मिळेल ! कांही काळजी करायला नको, समजलें ना ? - चाललेंच आहे ! यांत कशाचे आले आहेत उपकार ! - मोठा त्रास आहे ! हपीसांत कामाची दगदग, आणि घरीं यावें तर हा त्रास ! कोण पाहिजे ? - हो ! या बसा. मलाच आप्पासाहेब म्हणतात. काय काम आहे आपलें ? - भेटले होते खरेच. काल संध्याकाळींच त्रिंबकराव मला भेटले होते ! आपलें आडनांव काय - पोंकशे नाही का ? अस्सें ! यंदांच एस. एफ. पास झालांत वाटतें ? - टाइपराइटिंगसुद्धां येतें ! मग हो काय ? फारच चागलें ! अर्ज पाठवून दिला आहे ना ? - झालें तर ! अरे ! हें काय वेडयासारखें ! उठा, उठा. रडूं नका ! मिळेल नोकरी, - काय आहे तिच्याच मोठें ! अहो, लागलें नाहीं कोणाच्या ? - सगळ्यांच्या पाठीमागें द्रारिद्य लागलें आहे ! - जा ! मनाला काही वाटूं देऊं नका. तुमच्याकरितां मी लागेल तितकी खटपट करीन बरें - एकदां हो म्हणून सांगितलें ना ? जा आतां - काय पहा ! या पोटानें माणसाला कसें अगदी भंडावून सोडलें आहे - रडायला लावले आहे ! - येवढ्याचकरितां का खाली हाक मारीत होतां मला ? अबब ! किती फोडी रे या ! कटकट कोठली ! हपीसांतल्या जागेकरितां आतांपर्यंत शंभर जणांच्या खेपा झाल्या असतील ! - खरेंच, गोडीला आंबे मोठे छान आहेत नाहीं ? - तें कांहीं नाहीं मोरु, उद्यां तुला साहेबापुढें उभा केलाच पाहिजे. नाहीं तर - हं, अरे खाल्ल्या म्हणून काय झालें ! आणखी दोन फोडी घे - मूर्ख कोठले ! प्रत्यक्ष मुलाला टाकून माझ्या हपीसांतील जागा दुसर्‍याला मी मिळूं देईन कसा ? इतकें कसें यांना - हो, तें तर खरेंच ! आपलें हो - ला हो म्हणावें, सोडून द्यावें ! कशाला उगीच कोणाला दुखवा ! ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.