अन्वयार्थ – २/घातपाती आणि घायकुती

विकिस्रोत कडून


घातपाती आणि घायकुती


 प्पन वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धाचे लांबत चाललेले शेपूट झटकन संपविण्याकरिता अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांनी हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुबाँबचा हल्ला करण्याचा आदेश दिला. बाँबहल्ला झाला आणि अणुशक्तीच्या प्रचंड उत्पाताने सारे जग विस्मित आणि भयभीत होऊन गेले. माणसाच्या हाती एवढे संहारक हत्यार आले म्हणजे आता जगाचा विनाश अटळ आहे आणि फारसा दूर नाही अशी धास्ती जगभरच्या सामान्य माणसांनाही वाटू लागली. जगामधील तंटे, वादविवाद त्या काळापर्यंत चर्चेने, वाटाघाटींनी सोडवण्याचा प्रयत्न केला जाई; ते नच जमले तर आर्थिक हत्यारे वापरून प्रतिपक्षास जेर करण्याचा प्रयत्न होई. तेही जमले नाही तर अखेरचा पर्याय म्हणून सशस्त्र लढाईचा मार्ग चोखाळला जाई. दारूगोळ्याचा शोध लागेपर्यंत तलवारी- धनुष्यबाणांच्या लढाया, लढणाऱ्या सैनिकांच्या यातनांनी मोजमाप केले तर, सर्वांत भयानक होत्या. ज्या काळी शस्त्रक्रियेचे शास्त्र आणि तंत्र अगदीच मागासलेले होते, भूल देण्याचे तंत्रही अवगत नव्हते, प्रतिजैविकांचा (Anti-biotics) शोध लागला नव्हता अशा काळात जखमी झालेल्या सैनिकांना काय वेदना सोसाव्या लागत असतील याची कल्पनाही करणे कठीण आहे. दारूगोळ्याचा वापर होऊ लागला त्यामुळे जखमी सैनिकांच्या वेदना कमी झाल्या, पण युद्धात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या भूमितीश्रेणीने वाढली.
 जपानवर अणुबाँब पडण्याच्या आधी रणगाडे वापरले जात होते, विमानांतून बाँबवर्षाव होत होता, युद्धात देशच्या देश बेचिराख होत होते, हजारोंनी माणसे मरत होती; पण युद्धामुळे साऱ्या पृथ्वीचाच विनाश ओढवू शकेल अशी काही परिस्थिती नव्हती. हिरोशिमावरील अणुबाँबच्या हल्ल्याने माणसामाणसातील आणि देशादेशातील तंटेबखेडे कसे सोडवायचे यासंबंधीच्या साऱ्या विचारांना
एक नवी कलाटणी मिळाली.
 अणुबाँबच्या प्रचंड संहारक शक्तीमुळे अमेरिका व रशिया या महासत्तांनीसुद्धा समग्र युद्धाची शक्यता टाळली आणि कडेलोटच झाला तर, कोरिया, व्हिएतनाम यांसारख्या मर्यादित युद्धांपलीकडे मजल जाऊ दिली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या साऱ्या लढाया अण्वस्त्रे हाती असूनसुद्धा पारंपरिक शस्त्रास्त्रांनीच लढल्या गेल्या. दोन्ही महासत्तांच्या हाती सारे जग हजार वेळा उद्ध्वस्त करण्याची ताकद असूनही त्यांच्या नेत्यांनी वेळोवेळी सुज्ञपणा दाखवला आणि प्रलय टाळला. समाजवादी रशिया बुडाला; तरीदेखील आपल्याबरोबर जगही बुडविण्याची बुद्धी कम्युनिस्ट नेत्यांनीसुद्धा दाखविली नाही.
 अणुशक्तीच्या धाकाने जगात शांती नांदण्याच्या या परिस्थितीचे काही महत्त्वाचे परिणाम झाले.
 पहिला परिणाम म्हणजे अणुशक्ती वापरण्याकरिता लागणारा सुज्ञपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्या हाती अणुशक्ती जाऊ नये असे प्रयत्न अणुशक्तिधारी महासत्तांनी चालविले; तथापी अनेक छोट्यामोठ्या देशांनी अणुबाँबस्फोटासाठी लागणारी तांत्रिक आणि आर्थिक क्षमता तयार केली.
 वाटाघाटी किंवा चर्चा यांचे गुऱ्हाळ संयुक्त राष्ट्रसंघात किंवा इतरत्र वाटेल तितके लांबत ठेवता येते आणि निर्णायक युद्ध होऊच शकत नाही अशा कोंडीच्या परिस्थितीत जागोजागी असंतुष्ट समाजात आतंकवादाचा उगम १९७० सालानंतर झाला. विमाने पळविणे, बाँबस्फोट घडवून आणणे आणि टपालाने स्फोटके पाठविणे आणि मानवी बाँब अशी वेगळीवेगळी साधने अतिरेकी चळवळीने वापरण्यास सुरुवात केली. मादक द्रव्यांच्या जागतिक व्यापाराचा या अतिरेक्यांना चांगला आधार मिळाला.
 काही देशांच्या राज्यकर्त्यांनी राष्ट्रीय सशस्त्र दलांचा वापर करण्याऐवजी या अतिरेकी टोळ्यांचाच वापर राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी किंवा निदान शत्रूस जेरीस आणण्याकरिता केला.
 हिरोशिमावरील अणुस्फोटानंतर ११ सप्टेंबर २००१ रोजी इतिहासात एक अशी घटना घडली, की ज्यामुळे माणसामाणसातील आणि देशादेशातील तंटे कसे सोडवावे या विषयावरील सर्व विचार आमूलाग्र तपासून पाहण्याची गरज तयार झाली.
 अणुबाँबची संहारक शक्ती पाचदहा देशांपेक्षा जास्त देशांकडे जाण्याची शक्यता नाही. अणुबाँबचे तंत्रज्ञान हस्तगत झाले तरी शस्त्र म्हणून वापरण्याच्या
पद्धतीचा बाँब तयार करणे हे मोठे महागडे काम आहे. शत्रूवर अणुबाँबचा वर्षाव करण्याकरिता लागणारी विमाने, क्षेपणास्त्रे किंवा गुप्तहेरांची जाळी फारच थोड्या राष्ट्रांच्या आवाक्यातली आहेत.
 गेल्या ११ सप्टेंबर रोजी एका नवीन हत्याराचा जन्म झाला. त्याकरिता काही संशोधन लागले नाही, फारसा खर्चही आला नाही; पण परिणामी होणारा विध्वंस, महत्त्वाच्या उद्दिष्टांपुरता, अणुबाँबइतकाच विध्वंसक; पण त्यातून प्रलयाचा फारसा संभव नाही. हे हत्यार वापरण्याकरिता फौजांचीही आवश्यकता नाही.
 १९७० सालापासून विमानांच्या चाचेगिरीचे शास्त्र अतिरेक्यांनी चांगलेच अंगी बाणले आहे. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेस झुकांडी देऊन शत्रुराष्ट्राच्या नागरी विमानात प्रवेश मिळवायचा, विमानाने उड्डाण केले म्हणजे हाती असलेल्या किंवा नसलेल्या शस्त्रांचा धाक दाखवून आपल्याला सोयीस्कर विमानतळावर विमान उतरवून घ्यायचे, प्रवाशांना ओलीस धरून अतिरेक्यांनी आपल्या मागण्या मनवून घ्यायच्या, खंडणी पदरात पाडून घ्यायची आणि स्वतःचीही सुटका करून घ्यायची असे हे साधे; पण भयानक तंत्र. काही प्रसंगी प्रत्यक्षात विमाने पेटवून देण्यात आली. प्रवासी हताहत झाले. प्रवाशांनी त्याचीही सवय करून घेतली. विमानप्रवास आणि वाहतूक कमी होण्याऐवजी भूमिती श्रेणीने वाढत गेले. टोलेजंग आकाराची विमाने इंधनाचा प्रचंड साठा घेऊन शेकडो प्रवाशांसह जगभरच्या आकाशात फिरू लागली.
 ११ सप्टेंबर २००१ रोजी विमानाच्या चाचेगिरीच्याच तंत्राचा एक नवा अध्याय सुरू झाला, ज्याने जगाचा इतिहास बदलणार आहे. नव्या हत्याराचे तंत्र सोपे आहे. विमानाच्या चाच्यांनी आपला जीव वाचविण्याची कल्पना सोडून द्यायची आणि भरले विमान ताब्यात घेऊन ते शत्रूचे सर्वाधिक नुकसान होईल अशा जागी नेऊन आपटायचे.११ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी. एकाच तासात चार जंगी विमाने पळविली गेली; त्यांतील दोन न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनच्या, जगातील सर्वात उंच, जागतिक व्यापार केंद्राच्या दोन मनोयऱ्यांवर जाऊन आदळली. त्यामुळे झालेल्या आगडोंबाची उष्णता इतकी मोठी, की इमारतीतील सिमेंटच्या बांधकामातील लोखंडी गज वाकून दोन्ही मनोरे कोसळले. हल्ल्याच्या वेळी तेथे पन्नास हजारावर माणसे काम करीत होती. किती जगली, किती दगावली याचा हिशेब आजही लागलेला नाही. हे मनोरे म्हणजे अमेरिकेतील वित्तीय कारभाराचे आणि माहिती व्यवस्थेचे प्रतीक आणि केंद्रस्थान होते. फक्त बारा लोकांनी
हौतात्म्य पत्करून अमेरिकन राष्ट्रावर असा मर्मस्थानी प्रहार केला, की मागील दोनही महायुद्धांत कधी अनुभवास न आलेला विध्वंस अमेरिकेस सोसावा लागला.
 तिसरे एक विमान तर अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यालयाच्या जगप्रसिद्ध पंचकोनी 'पेंटॅगॉन' इमारतीवर जाऊन आदळले.
 जगभरात वेगवेगळ्या देशांत असंतुष्ट आत्मे आणि समाज अनेक आहेत. आपल्यावर असहनीय अन्याय होत आहे आणि तो दूर करण्याकरिता, आवश्यक तर प्राण पणाला लावण्याची तयारी शंभर-दोनशेतरी तरुणांत असणारे अनेक समाज आहेत. असे समाज अतिरेकी हत्याकांडाचे साधन गेली ३० वर्षेतरी वेगवेगळ्या पद्धतींनी वापरीत आहेत. आपल्या देशातही पंजाब, ईशान्य प्रदेश, काश्मीर येथील आतंकवादी आणि नक्षलवादी यांच्या अतिरेकी कारवायांचा अनुभव आला आहे. असंतोषाच्या या प्रदेशात विमाने पळविण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. विमानाच्या चाचेगिरीस कधीमधी मान्यवर राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे; पण विमानाची चाचेगिरी म्हणजे केवळ खंडणी गोळा करण्याचे आणि काही साथीदारांची सुटका करून घेण्याचे साधन न राहता आक्रमक लढाईचे हत्यार म्हणून वापरले गेले तर काय हाहा:कार माजेल याच्या कल्पनेनेच थरकाप होतो.
 अतिरेक्यांनी हे नवीन हत्यार हाती घेतले आहे आणि तेदेखील अमेरिकेसारख्या आर्थिक आणि लष्करी महासत्तेविरुद्ध. तेव्हा या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काहीतरी करणे अमेरिकेतील आणि जगातील इतर राज्यकर्त्यांना आवश्यकच होते.
 ११ सप्टेंबरनंतर सशस्त्र दलांची आयुधांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एके काळी सर्वसामान्य माणसाच्या हाती आणि घरी हत्यारे असत. आवश्यकतेप्रमाणे तो ती स्वसंरक्षणार्थ वापरू शकत असे. तशीच परिस्थिती पुन्हा तयार होत आहे. पारंपरिक शस्त्रे आणि अण्वस्त्रे किचकट आणि महागडी म्हणून कालबाह्य ठरत आहेत. शस्त्रास्त्रांचे खासगीकरण झाले आहे आणि जिवाच्या निर्धाराने निघालेला कोणीही थोड्याफार तयारीने प्रचंड उत्पात घडवून आणू शकतो अशी परिस्थिती तयार होत आहे.
 शस्त्रास्त्रांची आपली मक्तेदारी संपुष्टात येत आहे हे पाहता जगभरच्या सरकारांनी आतंकवादाविरुद्ध गिल्ला करावा हे समजण्यासारखे आहे. गेली काही दशके ज्यांनी आतंकवादाचा अप्रच्छन्न आणि छुपा वापर केला तीही
मंडळी, आपण त्या गावचेच नाही असा संभावितपणाचा आव आणून, आपला आतंकवादाला विरोध अहमहमिकेने गर्जून सांगत आहेत. पाकिस्तानदेखील आपण सतत अतिरेक्यांना विरोध केला आहे असे गर्जून सांगू लागला, तर भारताला तर आतंकवादाच्या विरोधातील आपले प्रयत्न सफल होण्याची संधीच चालून आली आहे असे वाटावे यात काय आश्चर्य?
 मॅनहॅटनमधील जागतिक व्यापार केंद्राचे मनोरे कोसळले, पेंटॅगॉनवर हल्ला झाला. ही घातपाती कृत्ये करणाऱ्यांना जबर शिक्षा करण्याच्या घोषणा झाल्या. पण, हा घातपात नेमका घडवला कोणी याबाबत फारशी स्पष्टता नाही. अफगाणिस्तानात मुक्काम ठोकून असलेल्या ओसामा बिन लादेन याच्याबद्दल अमेरिकन नेते आणि लोक यांच्या मनात अनेक वर्षे पराकोटीचा दुस्वास आहे. सहा वर्षांपूर्वी ओक्लहामा येथील विस्फोटानंतर हे लादेनचेच कृत्य असल्याचे घोषित झाले; नंतर मात्र, घातपाताचे सारेच प्रकरण 'स्वदेशी' असल्याचे निष्पन्न झाले. या वेळीही, ११ सप्टेंबरच्या हल्ल्यात आपला काही हात नाही असा निर्वाळा साऱ्या पॅलेस्टिनी घातपाती संघटनांनी दिला. लादेन यानेही दिला. एवढ्या प्रचंड कर्तृत्वाचे जनकत्व ज्या नेत्याने विश्वामित्री पवित्र्याने नाकारले. जपानमधील 'लाल सैन्या'ने हा घातपात आपण घडवून आणला असल्याची घोषणा केली, तिकडे कोणी लक्ष दिले नाही. साक्षीपुरावा फारसा न पाहता लादेन हाच गुन्हेगार असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जाहीर करून टाकले. अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची सर्व तयारी झपाट्याने होत आहे आणि परवापरवापर्यंत ज्या पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची मागणी होत होती, त्या पाकिस्तानलाच आतंकवादाविरोधाच्या चढाईत अग्रमानाच्या दोस्ताचे स्थान मिळाले आहे.
 या हल्ल्याबद्दल हिंदुस्थानात सर्वसाधारणपणे संतोषाची भावना आहे. मुसलमानी वर्चस्वाचे पारिपत्य आपल्या हातून होत नाही, तर परस्पर अमेरिकेसारख्या महासत्तेकडून ते होत आहे याचे एक नपुंसक समाधान हिंदुत्ववाद्यांना वाटत आहे.
 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा निर्णय आधीच केलेला आहे. 'चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा (Barking up the wrong tree) तर हा प्रकार नाही ना?' असे विचारल्यावर, 'आम्ही पुष्कळ संन्यासी धरले आहेत,' हे उत्तर शाब्दिक कोटी म्हणून ठीक आहे; पण त्याचा अर्थ महागंभीर आहे. पहिल्यांदा अमेरिका ठरवेल त्या देशावर हल्ला करायचा; सारा
विध्वंस झाल्यानंतर मग साक्षीपुरावा तपासायला लागायचे या पद्धतीने धाक (Gunboat Diplomacy) बसविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, पण हिरोशिमाच्या अणुस्फोटानंतर गेली ५६ वर्षे जिवाच्या आकांताने तंटणाऱ्या देशांनी आणि पुढाऱ्यांनी जो सुज्ञ मुत्सद्दीपणा दाखविला त्याचा या नवीन कालखंडात उंबरठ्यावरच बळी पडतो आहे. विमान नेऊन आदळण्याचे प्रकार यापुढेही होणार आहेत. प्रत्येक वेळी जर पोलिसी खाक्याने कारभार सुरू झाला तर जगाचे भवितव्य मोठे धोक्यात आहे.
 बिन लादेन याला विनाचौकशी दोषी ठरविण्यात इस्रायल आणि इतर मुसलमानविरोधी तत्त्वांनी चालविलेल्या प्रचाराच्या धोशाचा मोठा भाग आहे. वैमानिकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची आपली क्षमता नाही हे लादेन आणि तालीबान यांनी आवर्जून सांगितले आहे. आजच्या क्षणी असा घातपात घडविण्यात मुसलमान मूलतत्त्ववाद्यांना काही खास स्वारस्य दिसत नाही.
 याउलट, जपानी 'लाल सैन्या'कडे अशा घातपातासाठी लागणारी क्षमता पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे; ५६ वर्षे उलटून गेली तरी दर वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात जपानमध्ये हिरोशिमा-नागासाकीवरील अणुबाँबच्या प्रसंगामुळे झालेल्या जखमा भळभळून येतात. या गोष्टी लक्षात घेता संशयाचा काटा फक्त अफगाणिस्तानकडेच झुकण्याचे काहीच कारण नव्हते.
 आतंकवादाच्या या नव्या अध्यायात सर्वांत नवीन आतंकवादी गटाकडे कोणाचेच लक्ष गेलेले नाही. जागतिकीकरणाला विरोध करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी सिएटलपासून ते जिनोआपर्यंत चढत्या श्रेणीने धुडगूस घालण्याची क्षमता दाखवून दिली आहे. हिंसाचाराचे त्यांना वावडे नाही. माहितीतंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी जगभर जे संघटनेचे जाळे विणले आहे त्याचा वापर ११ सप्टेंबरच्या घातपातासारखा प्रकार घडवून आणण्यासाठी शक्य आहे. दोहा येथील आगामी वाटाघाटींस अपशकून करण्यासाठी या नव्या आतंकवाद्यांना काहीतरी मोठा उत्पात करून दाखविण्याची गरज वाटत होती. जागतिक व्यापार संस्थेला विरोध करणाऱ्या या अतिरेकी संघटनांनी जागतिक व्यापार केंद्राच्या मनोऱ्यांनाच आपल्या हल्ल्याचे उद्दिष्ट ठरविले असेल तर तेदेखील मोठे सूचक आहे. या मनोऱ्यांवर हल्ला करून हल्लेखोरांनी आपली निशाणीच हल्ल्याच्या जागी ठेवली आहे. आश्चर्य म्हणजे सिएटल-आतंकवाद्यांबद्दल संशय कोणी बोलूनही दाखविला नाही.
 तालिबानने गेली कित्येक वर्षे रशियाच्या अफगाणिस्तानातील आक्रमणास
नाकाम ठरवले, यामुळे अनेक तथाकथित प्रागतिकांचा त्यांच्यावर रोष आहेच. अलीकडे बुद्धाच्या मूर्ती पाडण्याचे रानवट काम तालिबानने, कोणाचीही पर्वा न करता, पुरे केले याबद्दलही त्यांच्यावर राग आहे. 'विनाश काले' सर्व रावणदुर्योधनांना स्त्रीजातीची छेड काढण्याची दुर्बुद्धी होते; तसेच तालिबानने स्त्रियांना गोशात ढकलून त्यांच्यावर जाचक निर्बंध लादण्याचा जो कार्यक्रम चालविला आहे, त्यामुळेही असेल.
 मॅनहॅटनमधील मनोरे कोसळताना हा घातपात कोणी केला यासंबंधी जवळजवळ सगळ्यांची मनोमन खात्रीच पटली. अफगाणिस्तानात काय व्हायचे ते होवो, लादेन यालाही काय शिक्षा व्हायची ती होवो; ११ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या इतिहासातील नव्या कालखंडात जागतिक स्तरावर सुबुद्ध न्यायव्यवस्था तयार झाली नाही तर पळवलेल्या विमानाचे हत्यार अण्वस्त्रापेक्षाही जगाच्या भवितव्यासाठी घातक ठरेल.

■ ■