अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/उज्ज्वल भवितव्याची त्रिसूत्री

विकिस्रोत कडून
र्धेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी व्यवस्थापकांना कोणत्या गुणांचा व तंत्रांचा विकास करावा लागेल, याबाबत आपण मागच्या लेखात काही मुद्यांचा परामर्ष घेतला. या लेखात उत्तम व्यवस्थापनाच्या आणखी काही पैलूंबाबत विचार

करणार आहोत.
एकरूपता किंवा समरसता :
 कोणत्याही संस्थेत काम करताना ती संस्था आपली आहे, या भावनेने कार्यरत राहणं आवश्यक आहे. एकरूपतेच्या भावनेइतका प्रभावी दुसरा प्रेरणास्त्रोत नाही. १९७७ मध्ये जनता राजवटीत टाटांच्या 'टिस्को’ या पोलाद कारखान्याचे राष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला सर्वात मोठा विरोध झाला तो टिस्कोच्याच कामगारांकडून! ‘आमच्या कंपनीचं आम्ही राष्ट्रीयीकरण करू देणार नाही', अशी गर्जना त्यांनी केली. टिस्कोच्या ७० हजार कामगारांचा कंपनीत एक टक्काही समभाग नव्हता, तरीही त्यांना राष्ट्रीयीकरण मान्य नव्हतं. परिणामी ते बारगळलं. यात ‘आमच्या ’ या शब्दाला खास महत्त्व आहे.
 ही समरसतेची भावना कशी निर्माण करता येईल हा प्रयत्न नवा नाही. त्यावरील उपायही नवा नाही. कोणत्याही धर्माचं उदाहरण पाहा. विभिन्न स्वभावांच्या व आवडीनिवडीच्या लोकांना आपण विवक्षित धर्माचे आहोत असं वाटतं कसं ही भावना निर्माण करण्याची युक्ती धर्मातच आहे. कोणतेही धार्मिक कार्य समूहाने करावे लागते. मुस्लिमांची प्रार्थना असो, चर्चमधील सेवा असोत किंवा हिंदूंच्या तीर्थयात्रा असोत, (नुकतीच संपलेली पंढरपूरची वारी, सध्या सुरू असेलली अमरनाथ यात्रा, व काही दिवसांनी सुरू होत असलेला कुंभमेळा ही उत्तम उदाहरणे आहेत.) त्यात समुदायाचा सहभाग धर्माने अनिवार्य बनवला आहे. अशा एकत्र काम करण्याने एकरूपतेची व समरसतेची भावना वर्धिष्णू होते. संस्था बळकट होते.
 औद्योगिक संस्थांमध्येही कर्मचाऱ्यांना एकत्र काम करण्याची सवय लावणं , त्यासाठी त्यांच्या कामाचं स्वरूप वेळापत्रक तशा पध्दतीचे बनवणं, ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, हे काम कौशल्याचं आहे.  सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैन्यातील जवानाचं उदाहरण पाहा. त्यांचा पगार ठराविक असतो, पण कामाचे तास निश्चित नसतात. शिवाय सतत जिवाला धोका असतोच. तरीही तो निर्धाराने उभा असतो. कारण त्याच्याबरोबर सर्वच जवान त्याच स्थितीत असतात. त्यांच्या रोज एकत्र कवायती चालतात. एकत्र जेवण होतं. पोशाखातून अंथरून पांघरूणापर्यंत सर्वात समानता असते. ही समानता हळूहळू वृत्तीत झिरपते. त्यानंतर ते एकमेकांशी व त्यांच्या 'मिशनशी’ समरस होतात. हीच समरसता त्यांच्या कार्यतत्परतेचं प्रेरणास्थान बनतं. अन्यथा गवताचं पातंही उगवू शकत नाही, अशा दुर्गम प्रदेशांत माणसाने वर्षानुवर्षे काढणं शक्य होणार नाही.
 आपलं काम, संस्था व सहकारी यांच्याशी कर्मचाऱ्यांना एकरूप करण्यासाठी जपानी कंपन्यांनी या युक्तीचा प्रभावी वापर केला आहे. कंपनीच्या अध्यक्षांपासून ते चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व गणवेश वापरतात. त्यामुळे ‘दृश्य समानता’ निर्माण होते. कामाची सुरुवात समूहगानाने होते. वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कुणीही हा रोजचा कार्यक्रम चुकवत नाही. (आपल्याकडे रोज सोडाच, पण १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी ध्वजवंदनासही सक्ती नसल्यास कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यल्प असते.) अशा साध्या भासणाऱ्या उपायांमधूनच जपानने विश्वव्यापी उद्योग निर्माण केले आहेत.
 भारतीय माणसाचा पिंड थोडा वेगळा आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा घरात प्रार्थना चालली असेल तर त्यात आपण आपला आवाज खुल्या मनाने मिसळतो, पण राष्ट्रगीत म्हणावयास लाजतो. कारण देव जितका ‘आपला' वाटतो, तितका देश वाटत नाही. सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात समरसता या प्रेरणास्त्रोताची जपणूक व विकास घडविण्यासाठी व्यवस्थापनास अधिक अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
'महत्त्वा' ची जाणीव :
 बऱ्याच वर्षांपूर्वी मला काठमांडूहून निमंत्रण आलं होतं. येताना पत्नीसही घेऊन यावं असं सुचविण्यात आलं. मी पत्नीस विचारलं तेव्हा ‘मी तुमच्याबरोबर आले तर घराकडे कोण पाहणार' असे विचारून तिनं येण्याचं नाकारलं. शेवटी ‘ते काही नाही, तुला बाबांबरोबर जावंच लागेल', असं प्रत्यक्ष मुलांनीच सुनावल्यानंतर ती कशीबशी तयार झाली, पण काठमांडूमधील आमच्या चार दिवसांच्या मुक्कामात तिच्या डोक्यात आणि तोंडात घराचाच विषय होता. घरात आपण महत्त्वाचे आहोत. आपल्याशिवाय घर चालणार नाही या भावनेपोटी हे घडत होतं.
 औद्योगिक संस्थेतही प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण येथे महत्त्वाचे आहोत, याची जाणीव झाली पाहिजे. आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, आणि ती पार पाडली नाही तर कंपनीचं नुकसान होणार आहे, ही भावना असेल तर कर्मचारी जास्त उत्साहाने काम करतील. अंतिमतः याचा संस्थेलाच फायदा होईल. अहंकार किंवा स्वत्वाची जाणीव हा अध्यात्मात विकार मानला जातो. मात्र व्यवस्थापनात तोच गुण ठरतो. कर्मचाऱ्याचा अहंकार संस्थेच्या हिताकरता उपयोगात आणणं ही तर कुशल व्यवस्थापनाची कसोटीच असते. एखाद्या कर्मचाऱ्याकडून कामगिरी करून घ्यायची असेल, तर चतुर व्यवस्थापक त्याला एकट्याला बोलावून सांगेल, 'बघ हे काम मला तुझ्याचकडून करून हवंय, तूच ते सर्वात चांगलं करू शकशील.या महत्व देण्याच्या तंत्रामुळे कर्मचाऱ्याचा अहंकार जागृत होतो. तो जास्त जोमाने कामाला लागतो.
 मला एकाने विचारले होते, ‘कारखाना आजारी आहे हे आपण कसे ओळखता?'
 मी म्हणालो, ‘मी कारखान्यात जातो. तेथील पाईप गळत आहेत, पिंपे फुटलेली आहेत, सिमेंटसारख्या वस्तू उघड्यावर पडून वाया जात आहेत असं दृश्य दिसलं कि मी ओळखतो की येथे कुणालाच काळजी नाही. हा कारखाना आजारी आहे. माझा अंदाज सहसा चुकत नाही’ कारखानाही लहान मुलासारखाच असतो. त्याच्याकडे आपलेपणाच्या भावनेने लक्ष दिलं नाही तर तो ‘आजारी’ पडणारच.
प्रगतीची जाणीव :
 मी इथं काम करतोय. माझी प्रगती होतेय. रोज मला काही तरी नवं शिकायला मिळतंय, ही भावनासुध्दा माणसाला कार्यप्रवण बनवते. विशेषत: तरुण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं हमखास घडतं. आजचा तरुण अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. लवकरात लवकर आपण उच्चपदावर पोचले पाहिजे. या कंपनीत तशी संधी मिळत नसेल तर दुसच्या कंपनीत चान्स घेऊ, वाटेल तितके कष्ट करायला आपली तयारी आहे, अशा विचाराने तो झपाटलेला असतो आणि याच भावनेला व्यवस्थित खतपाणी मिळेल अशी व्यवस्था व्यवस्थापकाने केली, तर या वृत्तीचा संस्थेला फायदा होतो.
 तसं पाहता हे सर्व गुण व्यवस्थापकामध्ये असतातच, पण सध्याच्या स्पर्धात्मक काळात त्यांचा अधिकाधिक विकास करणं आवश्यक आहे. त्यातच भारताचे उज्ज्वल औद्योगिक भवितव्य दडलेलं आहे.