पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काय? आपल्या जगभरच्या इतिहासात साधुसंतांच्या व संन्याशांच्या दोन परंपरा दिसतात. एक परंपरा समाज आणि त्याची दुःखे यांच्याविषयी पूर्णपणे उदासीन असते. आपण आपले जीवन परमेश्वराला समर्पित करून आपली परमेश्वराची भक्ती जगात वाढवावी याविना आपले दुसरे काही काम आहे असे या संतांना वाटत नाही. जगातील नानाविध प्रकारची दुःखे त्यांना जगाचा मोह दूर करण्याचे शिक्षण देतात. दुःखी माणसांना दुःखमुक्त व्हावयाचे असेल तर त्यांनी ईश्वरावर प्रेम करून स्वार्थ, मोह, अहंकार सोडवावा असे या परंपरेला वाटते. या परंपरेचे खंडन अगर तिची अवहेलना करण्याचा माझा हेतू नाही. कारण याही परंपरेत फार मोठी माणसे होऊन गेलेली आहेत. स्वतः संपूर्णपणे निर्मोही, निरिच्छ आणि निर्भय होणे ही असामान्य शक्ती आहे. पण याखेरीज साधुसंतांची दुसरी परंपरा आहे. या मंडळींचा ईश्वरावर दृढ विश्वास असतोच. स्वार्थातून मुक्त होण्याची त्यांची तपस्याही चालू असतेच. पण त्यांना असे वाटते की, आपण समाजाचे काही देणे लागतो. हे जगच परमेश्वरस्वरूप असल्यामुळे जगातील मानवाची सेवा करतानाच आपण ईश्वराची अधिक चांगली सेवा करू शकतो. या परंपरेचे संतही असेच मानतात की, स्वार्थातच अहंता, लोभ, मत्सर, द्वेष व दु:ख यांचे मूळ साठविलेले आहे. म्हणून स्वार्थाचा होम पेटविला पाहिजे. आपल्या वैयक्तिक जीवनाची उभारणी वैराग्यावरच असली पाहिजे. पण याबाबतची आपली साधना माणसाच्या सेवेत सफल झाली पाहिजे. लोकयात्रेचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी भगवद्गीतेतच कृष्णाने अर्जुनावर टाकलेली आहे. जनी जनार्दन समजून लोकसेवा करण्याची संतपरंपरा आता नाही म्हटले तरी अडीच हजार वर्षे जुनी आहे. या परंपरेचे संत कोणती तरी लोकसेवेची कामगिरी आपल्या अंगावर घेऊन समाजाच्या प्रत्यक्ष उपयोगी पडण्याचा प्रयत्न करीत असतात. या दोन प्रेरणेतूनच बौद्धांनी शाळा, अनाथालये, दवाखाने चालविले. बौद्धांच्या या कार्याचा प्रभावच ख्रिश्चनांवर पडलेला आहे. जगभर मिशनरी सेवा म्हणून शाळा, अनाथालये, दवाखाने चालवितात. यामागचे ध्येय हे आहे.

 ज्यांच्या धडपडीमागे अनेक स्वार्थी हेतू असतात अशी सामान्य माणसे आपण सोडून देऊ, पण आजही भारतात मदर टेरेसांचे प्रचंड कार्य चालू आहे. मदर टेरेसा कुणाला ख्रिश्चन करीत नाहीत. धर्मप्रसार करणे, ख्रिस्ताच्या कळपात नवनवी कोकरे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६३