पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जोडणे, सांभाळणे आहे तसे शत्रूचा पराभव करणे आले. म्हणून गृहस्थाश्रमाचे पुरुषार्थ काम व अर्थ असतात. या अर्थकामाची सोय सर्वसामान्य प्रतिष्ठित असावी म्हणून योग्य काय व अयोग्य काय याचे नियम असतात. म्हणून अर्थ व काम धर्माशी सुसंगत हवे. धर्म, अर्थ, काम यांचा तोल व संगती हे गृहस्थाश्रम धर्माचे वैशिष्ट्य आहे. यालाच व्यवहार, त्रिवर्ग-प्रतिपत्ती असे म्हणतात. म्हणून गृहस्थाश्रमात भोग असतो, अहिंसेसह हिंसा असते. सत्यासह असत्य असते व न्यायनीतीसह सोय असते. राजकारण हा या आश्रमाचा भाग आहे. मग जर हे खरे असेल तर संन्याशाने राजकारण का करावे? संत, संन्याशी, योगी, फकीर, वली, ऋषी, मुनी, ब्रह्मचारी यांचा राजकारणाशी संबंधच काय?

 हा प्रश्न फार मोठा आहे. त्याचे उत्तरही तेवढेच मोठे दिले पाहिजे. मी या प्रश्नांचे उत्तर संक्षेपाने देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्या संदर्भात आपण स्वामीजींकडे पाहू शकू. त्यापूर्वी त्यांच्या चरित्राचे प्रमुख टप्पे लक्षात घेतले पाहिजेत. स्वामीजींचा जन्म १९०३ सालचा. त्यांनी संन्यास घेतला १४ जानेवारी १९३१ ला, म्हणजे २८ वे वर्षी. या संन्यासापूर्वीच्या काळात ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठात (शासनमान्य शिक्षणावर बहिष्कार टाकून) शिकले व हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत त्यांनी अध्यापकाचे कार्य केले. स्वामी रामतीर्थ यांच्या परंपरेचा त्यांचा संन्यास, त्यामुळे फार मोठे विधिविधानांचे अवडंवर कधीच नव्हते. राजकारणात वेगाने खेचले जाऊन ज्येष्ठ राजकीय नेते होण्याचा काळ इ.स. १९३३ ते १९४८. लोकसभेत इ.स. १९४८ ते १९६२ - सुमारे १४ वर्षे. भूदान, खादी इत्यादी कार्यांत शेवटपर्यंत. २२ जानेवारी १९७२ मृत्यू. असा हा सत्तर वर्षांचा काळ होता. या कालखंडात त्यांना हैदराबादचे मुख्यमंत्री होण्याचा योग होता पण त्यांना सत्तापद नको होते. केंद्र शासनात मंत्री हाण्यासही ते तयार नव्हते. सत्तेचा मोह न होणे हा त्यांचा कायम स्वभावविशेष होता. ज्यांना प्रयत्न करूनही काही मिळू शकले नाही, मिळवता आले नाही अशा कार्यकर्त्यांचे मन जसे कडवटपणे भरलेले असते तसे स्वामीजींचे नव्हते. हैदराबाद भारतात येणे व या संस्थानाचे तुकडे होऊन, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अस्तित्वात येणे या बावी घडताच स्वामीजी कृतकृत्य व कृतार्थ झाले. त्यांच्याशी बोलणाऱ्याला जाणवत असे ते समाधान व वृत्तीची कृतार्थता.

 आता आपण पुन्हा मूळच्या प्रश्राकडे वळू. या संन्याशाचा राजकारणाशी संबंध

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६२