पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १८५

घरी भट असतो, त्याचा प्रयत्न एवढाच असतो की, भटशस पैका द्यावयाच्या वाटा नाना प्रकाराने यजमानास सुचवाव्या. संक्रांत आली, म्हणजे त्यांस सांगावे की तिळपात्रे द्यावी म्हणजे पुढे फार फळ आहे. दशाहार आला, म्हणजे वायने देववावी. आणि त्यात पाहिले, तर एकही पदार्थ उपयोगाचा नसतो. वीतभर सूप, बोटात जावयाच्या नाहीत अशा दोन बांगड्या; कोणत्याही कामाच्या उपयोगी पडावयाचा नाही, असा एक करंडा आणि चार पैसे, त्या मूर्ख गृहस्थास नाना प्रकारे गोष्टी त्याकडून सांगून देववितात; आणि चार पैसे मिळाले, एवढाच लाभ मानून इतर जिनसा टाकून देतात. याप्रमाणे वर्षांत किती वेळ करतात, याचा ठिकाण नाही व ब्राह्मणांस पुण्यकाळ किंवा व्रताचा दिवस सांपडणार नाही असा कोणताही दिवस वर्षांत नाही. त्याविषयी पुराणात तयारी आहेच. असा व्यर्थ खर्च गृहस्थाकडून करवितात आणि मग त्यांस जी प्राप्ती होते, जीवर हा खर्च व त्याचा जरुरीचा खर्च जातो. मग चांगले कामास खर्च करावयास त्यांस सामर्थ्य कोठून राहणार ? भट सर्व मिळून जातो आणि मूर्ख यजमान असला, म्हणजे भटाचे त्याचे फारच जमते.
 यजमान वारंवार भटास पुसतो, हे कर्म चांगले सांग झाले ना ? भट म्हणतो, "सांग सामर्थ्याप्रमाणे झाले; परंतु आणखी चार आणे जास्ती खर्च करता, तर बरे होते. उदककुंभावर दक्षणा फारच थोडी पडली." मग भोळसर यजमान असला, म्हणजे त्यांस तेच खरे वाटते आणि भटाचे सांगितल्यावरून चालतो. मुख्यत्वेकरून बायका फारच मूर्ख व अज्ञान असतात. याजमुळे या देशातील स्त्रियांस भट फार फसवितात.
 काय काय चमत्कार आहेत, ते लिहिताना पुरणार नाहीत. एखादी विधवा स्त्री झाली, म्हणजे तिच्याजवळ दोन पैसे असले, तर ते हरण करण्यास भट कारण होतात. तिला सांगतात की, बाई तुमचा नवरा मेला; आता मुले कोणाची, आणि बाळे कोणाची ? तुम्ही आपले जन्माचे सार्थक करून घ्या. या जन्मी वैधव्य प्राप्त झाले, असे पुढे तरी होऊ नये म्हणून काही प्रयत्न करा. हा पवित्र वैशाख आहे; किंवा कार्तिक आहे; अगर चातुर्मास्य आहे. पुष्कळ नेमधर्म व देवब्राह्मण याजकडे व्यय करीत जा; म्हणजे ईश्वर संतुष्ट होईल. देवाचे तोंड ब्राह्मण आहेत. त्यांस मिळाले म्हणजे देवास पोचले. आणि पहा, देवळात इतके लोक पैसे देतात; परंतु देव घेत नाही. ब्राह्मण घेतात. का की, देवाचे तोंड ब्राह्मणच. अशा गोष्टी सांगून त्यांजकडून दोन पैसे असतील, ते बाहेर काढवितात व स्त्रियांस मूर्खपणामुळे कित्येक गोष्टी ज्या उपहासास कारण,