पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
७६]

[माझा जन्मभरचा


अुपयोग कोल्हटकरांना पदांच्या दृष्टीने होअी. मी तेव्हा पदें करीत नसें, व मला गातांहि येत नव्हतें, यामुळे मला तो अुपयोग नव्हता. पण विनोदाच्या दृष्टीने मला हीं पारशी गुजराती नाटकें मोठ्या करमणुकीचीं वाटत. विनोद म्हणजे चांगल्या प्रकारचा सरस व शुद्ध विनोद नव्हे. पण या नाटककंपन्या विनोदाच्या नांवाने जो गोंधळ घालीत त्याने पुष्कळ हसूं येअी. आणि विनोदी पात्रांकडूनच काय, पण आपणाकडून गंभीरपणाचीं कामें करणा-या पात्रांकडूनहि, वेष, भाषा हाव-भाव या सर्वांत जे असंबद्धतेचे प्रकार घडत ते पाहून हसून हसून आमचें पोट दुखे. पारशी गुजराती नाटक मंडळ्यांना पोषाख, सीन-सीनरी झगझगीत करतां येअी. पण त्यांचें शिक्षण थोडें व अभिरुचि हीन दर्जाची. यामुळे हास्यास्पद प्रकारांची त्यांच्या नाटकांतून खूप चंगळ असे. अशा अेका कंपनीने “ हास्यरसपरिपूर्ण हरिश्चंद्र " नाटकाची जाहिरात दिली होती ! पण तशी जाहिरात दिली नसती तरीहि भागलें असतें. शोक करणें तो देखील कांही पात्रें असा करीत की त्यांनी डोळ्याला पदर लावून रडावे व आम्हीं पाहणारांनी तोंडाला पदर लावून हसावें ! गाणें मात्र केव्हा वाअीट तर केव्हा खरोखर चांगलें असे. पण चांगलें तेंहि कवाली ! चालींमध्यें नवीनपणा असे व त्या तालबाज असत. यामुळे तत्कालीन किर्लोस्कर कंपनीच्या नाटकांतील हरिदासी चालीपेक्षा त्या ब-या लागत. रा. कोल्हटकर हे स्वतः चांगले गाणारे होते. पण केवळ गाण्याच्या माधुर्याच्या व तलम तानबाजपणामुळे. त्यांना गळा अितका अनुकूल असतां त्यांनी शास्त्रीय पद्धतीने गाण्याचा कधीहि सराव केला नव्हता. पण त्या पद्धतीच्या गाण्याची त्यांना मनापासूनच गोडी नव्हती याचें मात्र आश्चर्य वाटे. त्यांना ठुंब-या, पदें, गज्जल हीं अधिक आवडत, व त्यांचा संग्रह कंठगत करणें हा, तीं तसलीं नाटकें पाहण्यास जाण्यांत, त्यांचा अेक हेतु असे. आणि त्यांचें पहिलें संगीत 'वीरतनय' नाटकच काय, पण अगदीं पुढच्या पुढच्या नाटकांतूनहि, या मुंबअीच्या पारशी-गुजराती नाटकांच्या पदांच्या चालींची छाया भरपूर दिसते. गद्याच्या बाबतींत मात्र ही छाया तितकीशी पडली नाही. तथापि प्रवेशरचनेंत म्हणजे आलटून पालटून गंभीर व विनोदी पात्रांचे प्रवेश घालण्याच्या पद्धतींत पडली. पण या बाबतींत कोल्हटकरांनाहि मागे टाकणारा अेक नाटककार भेटला तो गडकरी.