पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चित्कळेचा स्पर्श । ७

अभिप्राय दिलेला आहे. 'मराठी कादंबरी'चा इतिहास सांगतांना प्रा. वि. बा. आंबेकर यांनी जो अभिप्राय दिला आहे त्याचा आशय असाच आहे. "हरिभाऊंच्या लेखनाच्या प्रारंभकालीं (१८८०), महाराष्ट्रांत जें विचारमंथन होऊं लागलें होतें, त्याचा हरिभाऊंच्या तरल आणि संवेदनाक्षम अशा कलाप्रेमी अंतःकरणावर फार परिणाम झाला. "तीस कोटि लोक ब्रिटिशांचे जोडे पुसण्याची लाचारी करतात व तींतच आनंद मनातात" हें मॅक्स ओरलंचें एका ग्रंथांतील वाक्यं विद्यार्थिदशेच्या शेवटी शेवटी हरिभाऊंच्या वाचनांत आलें. असल्या वाक्याचा परिणाम संवदेनाक्षम मनावर व्हावा, अशी त्या वेळी भोवतालची परिस्थिति होती. चिपळूणकर, टिळक, रानडे, आगरकर, गोखले यांच्या विविध मत- प्रदर्शनांनी आणि कार्यपद्धतींनी हा कालखंड तेजस्वी बनलेला आहे. या गोष्टीला उद्देशूनच म. गांधींनी म्हटलें आहे की, पुण्यांतील लोकांनी जीवनाचे एक नवें अध्यात्म उत्पन्न केलें आहे."
 "काव्येतिहास संग्रहामुळेच महाराष्ट्रांत इतिहासाबद्दलची नवी जाणीव निर्माण झाली व तींतूनच वासुदेवशास्त्री खरे, रा. ब. पारनीस यांची नाना फडणीस, झाशीची राणी, ब्रह्मेंद्रस्वामी यांचों चरित्रे निर्माण झाली. आपल्या इतिहासाचा इंग्रज लेखक विपर्यास करतात हें पाहून स्वाभिमानी विद्वान् अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपल्या देशाचा कैपक्ष घेऊन असल्या इतिहासकारांवर टीकेचा आसूड उगारला," (आणि त्यामुळेच ही नवी जाणीव निर्माण झाली), असें गोपीनाथ तळवलकरांनी म्हटलें आहे. केशवसुत आणि हरिभाऊ आपटे यांनी काव्य व लघुकथा या क्षेत्रांत या जाणिवेमुळेच नवनिर्मिति केली असाच त्यांच्या चरित्रकारांचा अभिप्राय आहे. ('प्रदक्षिणा'- पहिली १० प्रकरणें पाहा).
स्फूर्तिस्थान
 वरील थोर कर्त्या पुरुषांच्या चरित्रकारांनीच त्यांच्या स्फूर्तिबद्दल असें मत मांडले आहे असें नाही. यांपैकी हरिभाऊ आपटे, पांगारकर, खरेशास्त्री, राजवाडे, यांनी स्वतःच विष्णुशास्त्री आपलें स्फूर्तिस्थान होय, असें लिहून ठेविलें आहे. टिळक, आगरकर यांचा आदर्श तोच होता हे प्रसिद्धच आहे. त्यांना परिस्थितीमुळे स्वतंत्रपणे प्रेरणा मिळाली असणें, हें पूर्ण शक्य आहे; पण ती मिळाल्यावर त्यांची मनें धावलीं तीं विष्णुशास्त्री यांच्याकडे, अन्यत्र नव्हे. याचा भावार्य तोच आहे. तेव्हा गेल्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांतील महाराष्ट्रीय कर्तृत्वाच्या मागे प्रेरक शक्ति म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर हीच होती, यांत शंकेला जागा नाही.
 प्रा. गं. बा. सरदार यांनी हाच भावार्थं साकल्याने 'अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका' या पुस्तकांत मांडला आहे. ते म्हणतात, "इ. स. १८७४ साली निबंधमाला निघाली आणि मराठी वाङमयाच्या इतिहासांत एका नवीन युगाला प्रारंभ झाला. त्या पूर्वी निबंध-वाङमय हे अगदी प्राथमिक स्वरूपाचें होतें. कोणत्याहि प्रश्नाची स्वतंत्र रीतीने सांगोपांग चर्चा करण्याची धमक त्या काळच्या