पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ । केसरीची त्रिमूर्ति

 हें अभिनव तेज, नवनिर्मितिक्षम अशी ही चित्कळा महाराष्ट्राला कोठून प्राप्त झाली ? नवजीवनरसांनी दुथडी भरून वाहणारी ही जी वाग्गंगा, तिचा उगम कोठे होता ? महाराष्ट्राच्या चिदाकाशांत नव्या सृष्टीचे हे हुंकार कोठून आले ?
 विष्णुशास्त्री चिपळूणकर व त्यांची निबंधमाला हें या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. महाराष्ट्रवाणीचा पति म्हणून ज्यांचा पंडितांनी गौरव केला आहे ते विष्णुशास्त्री हेच या नव्या सृष्टीचे जनक आहेत.
नवयुग
 वरील सर्व थोर पंडित, कवि, कलाकार, संशोधक यांच्या कार्याचें ज्यांनी विवेचन केलें आहे त्या सर्वांनी एकमुखाने, "त्यांनी क्रांति केली, नवयुग निर्माण केलें, मन्वंतर घडविलें" असे उद्गार काढले आहेत. आणि या क्रांतीमागची प्रेरकशक्ति म्हणजे निबंधमाला होय, असेंच मत नमूद करून ठेविलें आहे. त्या काळांतील ऐतिहासिक वाङमयाचा आढावा घेतांना म. म. दत्तो वामन पोतदार लिहितात, "शास्त्रीबुवांनी साने, मोडक व शाळिग्राम यांच्या साहाय्याने 'काव्येतिहाससंग्रह' मासिक चालवून एका नव्या युगाची स्थापना केली. राजवाडे, पारसनीस वगैरे जे तरुण पुढे इतिहास-कार्याला लागले त्या सर्वांना प्रेरणा शास्त्रीबुवांच्या लिखाणामुळे मिळाली, असे त्यांच्या लेखांवरूनच शाबीत होतें." 'मराठींतील निबंध-वाङ्मय' या आपल्या लेखांत प्रा. वि. ह. कुलकर्णी म्हणतात, "मालेची कामगिरी विध्वंसक आणि विधायक अशा दुहेरी स्वरूपाची आहे. चिपळूणकरांच्या विधायक कामगिरीकडे डोळेझाक करून त्यांच्या विध्वंसक कामगिरीचें भडक चित्र रेखाटणें, हें केव्हाही अनुदारपणाचें व अन्यायाचेंच निदर्शक ठरेल. टिळक, आगरकर, वि. का. राजवाडे, ह. ना. आपटे, शि. म. परांजपे, न. चि. केळकर इत्यादि श्रेष्ठ ग्रंथकारांची परंपरा ज्या मालेने निर्माण केली तिची योग्यता मराठी भाषेच्या इतिहासांत अगदी अनन्यसाधारण आहे हे मान्य केलेच पाहिजे."
 "प्रथम १८८० सालींच आपण एका महान् क्रांतीच्या उंबरठ्यांत येऊन पोचतों. इ. स. १८८० सालच्या दिवाळीत अण्णा किर्लोस्करांनी पुणे येथे आपल्या 'संगीत शाकुंतला'चा पहिला प्रयोग केला. इ. स. १८८० ते १९०० हा यापुढील वीस वर्षांचा टप्पा. या काळांत नाट्याची कल्पनातीत भरभराट झाली. हा वीस वर्षांचा कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासांत सर्वच दृष्टींनी विशेष महत्त्वाचा गणला जाईल. राजकीय, सामाजिक व धार्मिक ध्येयवाद या काळांत उदय पावत होता. पाश्चात्त्यांच्या जीवनाचे आदर्श जसेच्या तसे आपणांस घेतां येत नाहीत व घेणें इष्टहि नाही, हे दिसून येऊं लागलें होतें. आपल्या जुन्या परंपरागत आदर्शाच्या संशोधनाला व निरीक्षणाला त्यामुळे या काळांत अधिक जोर चढला होता." 'नाट्यवाङ्मय व त्याचा विकास' यांचे विवेचन करतांना प्रा. बनहट्टी यांनी हा