पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकरूप व्हावयाचे. खरे वारकरी भाविकतेने वारी करतात, त्यात अनंत दुःखाला तोंड द्यावे लागत असूनही ते सर्वस्वाने वाट चालत असतात. पाऊस येतो, उन्हाचा त्रास होतो, अन्नपाणी मिळो वा न मिळो; मुखात विठ्ठलाचे किंवा देवासमान ज्ञानदेव, तुकाराम यांचे नाव घेत मार्गक्रमण करत असतात. विश्वास असा की "माझा विठ्ठल सर्वकाही संभाळेल." हा भाव जेव्हा मनात बाळगून प्रार्थना केली जाते त्या प्रार्थनेत अफाट शक्ती असते. परमेश्वराला आपण समजतो की हा असा आहे - " मूकं करोति वाचालम् । पंगुम् लंघयते गिरीम् ।" हेच प्रार्थनेद्वारे होऊ शकते. स्पिनड्रिफ्टच्या अनेक प्रयोगांतून हे सिद्ध झाल्यावर एक प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर म्हणाले की, "आता आपल्याला रुग्णाच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधाबरोबर 'प्रार्थना - सकाळ - दुपार - सायंकाळ' असे लिहावयास पाहिजे." ही प्रार्थना फक्त मानवाच्याच उपयोगी पडते असे नाही. वनस्पती, प्राणी किंबहुना जे जे सजीव आहे त्या त्या घटकाला याचा उपयोग होऊ शकतो. प्राण्यांना सुद्धा कसा उपयोग होतो ह्याचे उदाहरण आपण पाहू.
  माझे मित्र श्री. श्रीपादराव जोशी यांच्या पत्नी माणिकताई श्रद्धा व प्रार्थना यांच्या जोरावर मृत्यूच्या दारातून परत आल्याची कहाणी आपण पाहणार आहोत. त्यांचीच दुसरी कहाणी नमूद करण्याजोगी आहे. या ओळखीच्या व्यक्तींच्या कहाण्या देण्यामागे उद्देश एवढाच की त्यांचा मी स्वतः अनुभव घेतला आहे, त्यामुळे त्या अत्यंत विश्वासार्ह आहेत. श्रीपादरावांचे धाकटे चिरंजीव उमेश यांना प्राणी, जंगले याविषयी अत्यंत प्रेम. एकूणच परिसराविषयी खूप आस्था आहे. त्यांना श्वानजातीचे खूप प्रेम. त्यांनी एक जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा पाळलेला आहे. काही वर्षांपूर्वी त्याला एक चमत्कारिक रोग झाला व तो खंगत चालला. पशुवैद्यांची औषधे चालू होती परंतु गुण येईना. शेवटी उमेश यांनी आईला सांगितले की, "आई, आता तूच राजासाठी प्रार्थना कर, माझे सर्व उपाय खुंटले.” सौ. माणिकताईंनी नियमित राजासाठी प्रार्थना सुरू केली. आणि राजा सुधारू लागला व शेवटी पूर्ण बरा झाला. आता तो वयानुसार वृद्ध झाला आहे परंतु प्रकृतीने उत्तम आहे.

 मानवाला जशा भावना असतात तशाच प्राण्यांनाही असतात ते सिद्ध झालेले आहे. अशाच भावना वृक्षवल्लींनाही असतात. . संगीतामुळे गाईंचे दूध वाढते, वृक्षांची वाढही चांगली होते. हेच कार्य समरस होऊन केलेल्या प्रार्थनेमुळेही होऊ शकते.

१०७