श्री जगन्नाथाष्टकम्

विकिस्रोत कडून

श्री जगन्नाथाष्टकम्


कदाचित्कालिन्दीतटविपिनसड्गीतकवरो    मुद्रा गोपीनारीवदनकमलास्वादमधुपः ।
रमाशंभुब्रह्माऽमरपतिगणेशार्चितपदो    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥१॥

कोणे एके काळी यमुनेच्या किनाऱ्यावरील वृंदावनात गाण्याचा छंन्द घेऊन फिरणारा (सतत गाणी गाणारा), कधी कधी आनंदाच्या भरात गोपीजनांच्या मुखकमलांचा रसास्वाद घेण्यात एखाद्या भ्रमराप्रमाणें तन्मय झालेला व लक्ष्मी, शंकर, ब्रह्मा, अमरपती - इन्द्र त्याचप्रमाणे श्री गणेश इत्यादी देवतांनी ज्याच्या पदाची अर्चना केली आहे असा तो, सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ, मला दर्शन देवो. ॥१॥

भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे    ढुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते ।
सदा श्रीमद्‌वृन्दावनवसतिलीलापरिचयो    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥२॥

उजव्या हातात मुरली धारण केलेला, मस्तकावर मोराचे पंख धारण केलेला, कमरेभोवती रेशमी वस्त्र धारण केलेला, आपल्या मित्रजनांवर कटाक्ष (दृष्टिक्षेप)टाकत असलेला, नित्य शोभेने सम्पन्न असलेल्या वृंदावनात वास्तव्य करून भक्तजनांना विविध प्रकारच्या लीलांचा परिचय करून देणारा असा सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ मला दर्शन देवो. ॥२॥

महाम्भोधेस्तीरे कनकरुचिरे नील-शिखरे    वसन्प्रासादान्तः सहजबलभद्रेण बलिना ।
सुभद्रामध्यस्थः सकल सुरसेवाऽवसरदो    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥३॥

महासागराच्या किनाऱ्यावरील नीलाचल प्रदेशातील सुवर्णाप्रमाणे दैदिप्यमान शिखर असलेल्या राजप्रसादात आपले सहोदर (बंधू) बलराम ह्यांच्यासह आपली सख्खी बहीण सुभद्रा, हिला मध्यभागी उभें करून विराजमान झालेला आणि ज्याने सर्व देवांना सेवा करण्याची संधी दिलेली आहे असा सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ मला दर्शन देवो. ॥३॥

कृपा पारावारः सजलजलश्रेणिरुचिरो    रमावाणीसोमस्फुरदमलपद्मोदभवमुखैः ।
सुरेन्द्रैराध्यः श्रुतिगणशिखागीतचरितो    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥४॥

कृपेचा अथांग महासागर, पाण्याने भरलेल्या ढगांच्या समूहाप्रमाणे ज्याची अंगकान्ती अत्यंत रुचिर म्हणजे सुन्दर दिसत आहे, श्री (लक्ष्मी), सरस्वती, चंद्र तसेच दैदिप्यमान अशा श्रीहरीच्या नाभी कमलातून ज्याची उत्पत्ती झाली आहे असा ब्रह्मदेव इत्यादि सर्वश्रेष्ठ देवांकडून ज्याची आराधना केली जात आहे, वेदसमुकायाकडून ज्याची स्तुतीस्तोत्रे गायिली जात आहेत असा सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ मला डोळ्यांनी दिसावा. ॥४॥

रथारूढो गच्छन्पथि मिलितभूदेवपटलैः    स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः ।
दयासिन्धुर्बन्धुः सकल जगतां सिन्धुसुतया    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥५॥

युद्धात विजयी होऊन रथातून द्वारकेला जाताना मार्गात भेटणाऱ्या ब्राह्मण समुदायाने केलेंले गुणवर्णन आणि आशीर्वाद पावलोपावली ऎकून अन्तःकरण दयेने भरून येऊन ब्राह्मणांवर पूर्ण कृपा करणारा दयासागर, जगाचा बंधू, सिंधुसुता म्हणजेच लक्ष्मीच असलेल्या रुक्मिणीसह सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ मला दर्शन देवो. ॥५॥

परब्रह्मापीडः कुवलयदलोत्फल्लनयनो    निवासी नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि ।
रसानन्दो राधासरसवपुरालिड्गनसुखो    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥६॥

सर्वतोपरि श्रेष्ठ असलेले परब्रह्म हाच ज्याचा आपीड म्हणजे मुकुट आहे (अर्थात श्रीकृष्ण परब्रह्मस्वरूपच आहे), ज्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे प्रफुल्ल आहेत, नीलपर्वतावर वास्तव्य करणारा आणि शेषनागाच्या मस्तकावर आपले चरण ठेवणारा, रस - आनन्दस्वरूप, 'सरस' म्हणजे भक्तीने परिपूर्ण असलेल्या श्रीराधेच्या देहाला आलिंगन देण्यात ज्याला आनन्द वाटतो असा सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ मला दर्शन देवो. ॥६॥

न वै प्रार्थ्यं राज्यं न च कनकता भोगविभवे    न याचेऽहं रम्यां निखिलजनकाम्यां वरवधूम् ।
सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥७॥

मी काही राज्याची मागणी करीत नाही, विविध भोगवैभवाला उपयुक्त असलेले सोनेही मी मागत नाही, सर्व लोकांनी जिची कामना करावी अशी एकादी रमणीय, सुन्दर, उत्कृष्ट वधूही मी मागत नाही; तर सदासर्वकाळ क्षणोक्षणी प्रथमगणांचा अधिपति जो भगवान शंकर ह्याने ज्याचे चरित्र गायलेले आहे असा सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ मला दर्शन देवो. ॥७॥

हर त्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते    हर त्वं पापानां विततिमपरां यादवपते ।
अहो दीनानाथं निहितमचलं पातुमनिशं    जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥८॥

हे भगवन् सुरपते म्हणजे देवाधिदेवा ! आपण माझ्या ह्या असार संसाराचा त्वरित निरास करा. हे यादवपते गोपाळकृष्णा ! माझ्या हातून घडत असलेल्या पापांच्या परम्परेचे पण आपण निरसन करा. दीनांचे आणि अनाथांचे रक्षण करण्यासाठी आपण अहोरात्र बद्धपरिकर आहात; अशा सर्व जगाचे स्वामी असलेल्या जगन्नाथा ! मला दर्शन द्यावे. ॥८॥

॥ इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं जगन्नाथाष्टकं संपूर्णम् ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.