Jump to content

पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) आपण काही तरी विशेष महत्त्वाचे काम करीत आहों अशी एक प्रकारची जाणीव व तदनुषंगी एक प्रकारचा स्वाभिमान त्याच्या मनांत जागृत होतो. व एकदा ते बांधून झाले व मनाचे पांग फिटले म्हणजे त्यांत कितीहि सामान्य चुका झालेल्या असल्या तरी ते येणाऱ्याजाणाऱ्यांस आंतून- बाहेरून दाखविण्यात त्याला एक प्रकारचा आनंद वाट्न पाहणाऱ्यांच्या मनात नसले तरी " काय तुम्ही आमचे घर नाही पाहिलेत, या पहा. " असें म्हणून जवळजवळ जबरदस्तीने तो त्यांस ओढून नेतो. स्वयंपाकघरात, शेवघरांत आंत शिरून घरांतील माणसांस निष्कारण त्रास द्यावयाचे त्यांच्या जिवावर येत असेल, परंतु उलटपक्षी त्यांनी जर मोकळ्या मनाने हिंडून पाहून "वाहवा ! फार छान !” असे उद्गार काढले नाहीत तर मात्र मालकाची फार निराशा होते. या भावनेच्या बुडाशी कदाचित् असे एक कारण असू शकेल की, घर बांधणे ही गोष्ट मनुष्याच्या हयातीत वरचेवर घडत नाही, तेव्हां सबंध आयुष्यात एकदाच घडणारी, जिच्यामुळे समानांत स्थैर्य प्राप्त होत असे समजले जाते, अशी महत्त्वाची गोष्ट आपण करीत आहों, मशी जाणीव व तिजमुळे त्यास स्वाभिमान उत्पन्न झाला तर त्यांत नवल काय ? ___अशी एक मोठी गोष्ट आपण करीत आहो असे मालकास वाटत असले तरी तिचे सर्व श्रेय व जबाबदारी यांचे आपण एकटेच मालक होणे अयोग्यच नव्हे तर कित्येक वेळा मूर्खपणाचेहि ठरते. म्हणून येथे एक व्यावहारिक सूचना करणे अप्रासंगिक होणार नाही. घर बांधावयाचें तें नर सुखासाठी तर आपल्या सुखदुःखाची वांटकरी जी आपली पत्नी व घरच्या इतर स्त्रिया त्यांचा घरांतील मुखसोयींच्या बाबतीत योग्य तो सल्ला वेळीच घेणे हे कर्तव्य म्हणूनच नव्हे तर व्यवहाराच्या दृष्टीनेंहि शहाणपणाचे आहे. कारण तसे न केल्यास जी इमारत मूर्त स्वरूपांत येण्यापूर्वी तिचा ध्यास लागून स्वप्नसृष्टीत अनेकदा पाहिल्याचे भाग्य लाभले होते व जिच्याबद्दल एवढा मोठा स्वाभिमान एकसारखा मनांत वसत होता, नीत रहावयास जाऊन ८-१५ दिवस झाले नाहीत तोच अभिमानाचा उंच डोलारा ढासळू लागतो. “ ही खोली तेथे पाहिजे होती, जिना येथल्यापेक्षा तेथे बरा झाला असता. कपाटाची सोय चांगली नाही, चुलीतील धूर डोळ्यांवर येतो, अमुक ठिकाणी पाहिजे तेवढा अडोसा नाही, एवढ्या घरांत देवपूजेस चांगली निवांत जागाच नाही," अशा एकना दोन हजार तक्रारींचा पाढा कानांवर नित्य