Jump to content

पान:Sanskruti1 cropped.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोलत असा का नाही? मी काय अपराध केला? - त्याने - कैकेयीला विचारिले, "आई, माझ्या कुठच्या अपराधामुळे राजा इतका संतापला आहे? राजा काय सांगेल ते मी करीन, अशी माझी प्रतिज्ञा आहे. राम कधीही दोनदा (तेच-ते) बोलत नसतो.” रामाने असे म्हटल्यावर कैकेयीने वरांची कथा सांगितली आणि म्हटले, "जर तू आपल्या बापाला सत्यप्रतिज्ञा करू इच्छीत असलास. तर आजच्या आज चौदा वर्षे वनात जा. भरताला अभिषेक होणार आहे.” राम म्हणाला, “एवढेच काय, ह्यापेक्षाही दारूण काही सांगितलेस, तरी मी करीन. पण राजाला म्हणावे, रागावू नकोस. भरताला आणायला दूत पाठव. हा मी दण्डकारण्यात चाललो." हे ऐकून कैकयी म्हणाली, "राजाला लाज वाटत आहे, म्हणून तो बोलत नाही. तू शक्य तितक्या लवकर जा. तू जाईपर्यंत तो स्नान व भोजनही करणार नाही. (२.१६.१...४२) हाय, हाय!' असे म्हणून राजा पलंगावर बेशुद्ध पडला व राम उठून चालू लागला. ह्या सर्व घटनेत दशरथाने स्वतः दूताला 'रामाला आणव' एवढे आपल्या तोंडाने सांगितले, बाकी काही नाही. तो बोललाच नाही. जणू तो रागावलाच आहे, अशा त-हेने सर्व बोलणे कैकेयीने केले. राजा स्त्रीलंपट, म्हातारा व बालिश. ही सर्व विशेषणे निरनिराळ्या लोकांनी राजाला दिलेली आहेत. लक्ष्मण तर चक्क सांगतो. तदिदं वचनं राज्ञः पुनर्बाल्यमुपेयुषः । पुत्रः को हृदये कुर्यात् ....।। (२.१८.१७). “कोणच्या मुलाने (म्हातारपणामुळे) पुन्हा बालपण आलेल्या राजाचे मानावे बोलणे मानावे?" राजा कैकेयीकडे जातो, तेव्हाचे वर्णन वृद्धस्तरूणीं भार्या प्राणेभ्योऽपि गरीयसीम् । ददर्श धरणीतले ।। (२.१०.३). त्या वृद्धाने प्राणांपेक्षाही अधिक अशा आपल्या तरूण बायकोला जमिनीवर घडलेले पाहिले. राम स्वतः बापाबद्दल असेच बोलतो- शोकोपहतचेताश्च वृद्धश्च जगतीपतिः । कामभारावसन्नश्च तस्मादेतद् ब्रवीमि ते ।। (२.४६.१६). १६ । ।।संस्कृती ।।