Jump to content

पान:Ganitachya sopya wata.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



म्हणून दशांश अपूर्णांकाच्या उजव्या बाजूच्या शून्यांचा उपयोग होतो, व दशांश टिंब कितीही स्थाने उजवीकडे नेता येतो.

पुन्हा एकदा लक्षात ठेवा की एकावर शून्ये असलेल्या संख्येने भागताना शून्यांच्या संख्येइतकी स्थाने, दशांश टिंब डावीकडे न्यायचे तर तशा प्रकारच्या संख्येने गुणताना, दशांश टिंब शून्यांच्या संख्येइतकी स्थाने उजवीकडे न्यायचे. पूर्णांकाने भागाकार करताना दशांश टिंब डावीकडे न्यायचे कारण असा भागाकार केल्यावर संख्या कमी होते. पूर्णांकाने गुणाकार करताना तेच टिंब उजवीकडे न्यायचं कारण असा गुणाकार केल्यावर संख्या वाढते. हेही लक्षात ठेवा की दशांश चिन्ह उजवीकडे गेलं की संख्या मोठी होते.

.0625 < 0.625 < 6.25 < 62.5 < 625

सरावासाठी पुढील गुणाकार करा.

41.36 x 1000, 5.2 X 100, 2.7645 x 1000,

36.92 x 100, 85.04 x 1000, .68 x 10.

आता कुठल्याही दोन दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा असतो ते पाहू.

उदा० 36.5 x 1.7 हा गुणाकार करायचा आहे. हाच गुणाकार 365 x 17/100 असाही करता येईल.

म्हणजे दशांश टिंब काढून टाकून ज्या पूर्ण संख्या येतात त्यांचा साधा गुणाकार करायचा व मग योग्य जागी दशांश टिंब द्यायचं - जर एकूण छेदामधे 10 X 10 = 100 अशी संख्या असेल, तर उजवीकडे दोन आकडे ठेवून टिंब द्यावं लागेल. जसे

365 X 17 = 6205

365 x 17/100 = 62.05

किंवा 36.5 x 1.7 = 62.05

५०
गणिताच्या सोप्या वाटा